मी फक्त महापौरांनाच भेटणार; सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरेंनी दाखवून दिला नगरसेवकांना प्रोटोकॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:15 PM2019-03-01T12:15:02+5:302019-03-01T12:17:52+5:30
सोलापूर : महापालिकेचे नवे आयुक्त दीपक तावरे रुजू झाले. महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली. त्यानंतर आयुक्तांनी भाजपा पक्ष ...
सोलापूर : महापालिकेचे नवे आयुक्त दीपक तावरे रुजू झाले. महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली. त्यानंतर आयुक्तांनी भाजपा पक्ष मिटिंगकडे यावे, असा निरोप नगरसेवकांकडून देण्यात आला. मात्र ‘प्रोटोकॉल’नुसार मी फक्त महापौरांनाच भेटणार, असे सांगून आयुक्तांनी या बैठकीत जाणे टाळल्याची चर्चा दिवसभर मनपा वर्तुळात होती.
महापालिकेचा पदभार घेण्यापूर्वी दीपक तावरे यांनी सकाळी ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांचे दर्शन घेतले. देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत केले. उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील, नगरअभियंता संदीप कारंजे, कामगार कल्याणचे विजयकुमार कांबळे आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पदभार घेतला. महापौर शोभा बनशेट्टी यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.
महापौर बनशेट्टी यांनी त्यांना शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम आणि स्मार्ट सिटीची कामे आदी गोष्टींना भाजपाने प्राधान्य दिले असून, त्याबाबत आपणही सहकार्य करावे, असे सांगितले. यादरम्यान पंडित दीनदयाळ सभागृहात भाजपा नगरसेवकांची सर्वसाधारण सभेबाबत चर्चा करण्यासाठी बैठक सुरू होती. महापौरांशी चर्चा सुरू असताना नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी आयुक्त दीपक तावरे यांना, नगरसेवक तुमची वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्त तावरे यांनी, ‘मी प्रोटोकॉलनुसार महापौरांना भेटणार’, असे सांगितले. महापौरांची भेट घेऊन ते आपल्या कार्यालयात आले. यानंतर विविध पक्षीय नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
उस्मानाबाद बँकेची वसुली कशी केली ते विचारा : तावरे
- पत्रकारांशी बोलताना आयुक्त तावरे म्हणाले, मी सहकार खात्यात काम केले आहे. सोलापूर काय कुठेही काम करण्याची माझी तयारी आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेचा प्रशासक असताना थकबाकी कशी वसूल केलीय ते राजकीय नेत्यांना विचारा. महापालिकेतील सर्व पदाधिकाºयांशी, नगरसेवकांशी समन्वय साधून काम करेन.
- डॉ. अविनाश ढाकणे यांनी चांगले काम केले आहे. आपणही स्मार्ट सिटीच्या कामावर लक्ष ठेवून काम करणार आहोत. जे नियमबाह्य असेल ते कदापि स्वीकारले जाणार नाही. जागतिक बँकेच्या सहकार्याने अर्बन फूड सिस्टीम हा प्रोजेक्ट राबविणार आहे. या प्रकल्पाची सविस्तर माहिती आपण लवकरच देऊ, असेही त्यांनी सांगितले.