...तर जिल्ह्याच्या हितासाठी पहिल्यांदा मी राजीनामा देईन : बबनराव शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:48+5:302021-05-22T04:20:48+5:30
भीमानगर : जर इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द नाही केला तर जिल्ह्यात सर्वांत अगोदर न्यायालयात जाण्याचा इशारा मी स्वतः ...
भीमानगर : जर इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द नाही केला तर जिल्ह्यात सर्वांत अगोदर न्यायालयात जाण्याचा इशारा मी स्वतः पक्षाला दिला होता. आजही शासनाने आदेश रद्द नाही केला तर मी माझ्या जिल्ह्यासाठी आमदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा आमदार बबनराव शिंदे यांनी दिला.
इंदापूरच्या ५ टीएमसी पाण्यावरून सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना आ. बबनदादा शिंदे म्हणाले, पक्षाच्या नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. परवाच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे, की सोलापूरच्या हक्काचे पाणी इतर कुठे वळणार नाही. त्यावर सोलापूरकरांचा हक्क आहे व शासनाने जो आदेश काढलेला आहे तो आम्ही रद्द करू, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
यावर आमदार शिंदे म्हणाले, सध्या श्रेयवादावरून बरीच चर्चा आहे. राजकीय आरोप एकमेकांवर करत आहेत; परंतु ही वेळ राजकारण करण्याची नाही. या वेळी जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली. उजनी धरणामध्ये कोणत्याही प्रकारचे शिल्लक पाणी नाही. जिल्ह्यामध्ये दोन ते तीन पाळ्यादेखील मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इंदापूरच्या योजनेला पुणे पिंपरी-चिंचवड शहराचे सांडपाणी द्यायचे असेल तर ते पुण्याजवळच उचलून नजीकच्या खडकवासला कॅनॉलमध्ये टाकून द्यावे, त्यास आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही. मात्र, जर कोणी उजनीतून पाणी नेणार असेल तर आम्ही जनतेच्या सोबत राहू.
जर शासनाने उजनीतून पाणी उचलण्याच्या आदेश रद्द केला नाही, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वप्रथम मी राजीनामा देईन, अशी स्पष्ट भूमिका घेतली.
---