साेलापुरातील 'आयएएस' अधिकारी वारकऱ्यांच्या वेशात; प्रत्येकाची काळजी घेत २४ तास पालखीसोबतच
By Appasaheb.patil | Published: July 12, 2024 02:15 PM2024-07-12T14:15:06+5:302024-07-12T15:01:26+5:30
पालखी सोहळ्यात भजन, भारूडाचा आनंद घेतला.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : आषाढी वारीचा सोहळा बुधवार १७ जुलै २०२४ रोजी पंढरपुरात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून १५ लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात येतात. प्रत्येक भाविक, वारकऱ्यांची काळजी घेत २४ तास पालखी सोबतच दक्ष असणारे सोलापुरातील आयएएस अधिकारी सध्या वारकऱ्यांच्या वेशात दिसून येत आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे व सोलापूर ग्रामीण पाेलिस दलाचे अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी पालखी सोहळ्यात भजन, भारूडाचा आनंद घेतला. पायी चालत चालत भक्तीरसात चिंब झालेले सोलापूरचे आयएएस अधिकारी वारीत सहभागी झालेल्यांना वेळेवर सेवासुविधा देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत.
पालखी मार्गांवर सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधाबाबत पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ, प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डाॅ. भावार्थ देखणे यांच्याशी जिल्हाधिकारी, सीईओ, पेालिस अधीक्षकांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. याचवेळी पालखी मार्गांवर देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती आयएएस अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखांना दिली. शुध्द पाणी, आराेग्य सेवा, बंदोबस्त, शौचालये, राहण्याची, मुक्कामाची सोय आदी विविध सेवासुविधा वारकऱ्यांंसाठी पुरविण्यात आल्या आहेत. या सेवा वेळेवर मिळतात की नाही ? कोणाला काही अडचण तर नाही ना ? याबाबतची विचारणा आयएएस अधिकारी सातत्याने पालखी सोहळा प्रमुखांकडे करीत आहेत. कोणत्याही अडीअडचणी येऊ नये यासाठी सोलापुरातील दोन आयएएस व एक आयपीएस अधिकारी यांच्याबरोबरच त्यांची टीम अहोरात्र काम करीत आहे.