सहकारी संस्थांच्या संचालकांना मताधिकार देण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 05:21 AM2018-07-15T05:21:03+5:302018-07-15T05:21:10+5:30
राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत बँकेशी संलग्नित असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत विचार सुरू आहे
सोलापूर : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत बँकेशी संलग्नित असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, विविध कार्यकारी सोसायट्या फक्त सभासद असलेल्या शेतकºयांनाच कर्ज देतात. ठराविक लोकच त्याचे सभासद असतात. शेतकºयाला सावकारीपासून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शेतकºयांना सोसायटीचे सभासद करुन घ्यावे लागेल. याबाबत निर्णय घेत आहोत. जिल्हा बँकांशी अनेक सहकारी संस्था, सूतगिरण्या, पतसंस्था आदी जोडलेल्या असतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संचालकांनी निश्चित केलेल्या एकाच प्रतिनिधीला मतदानाचा अधिकार असतो. पुढील काळात संस्थेतील सर्व संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत विचार सुरु आहे. सभागृहातही त्यावर चर्चा झाली. विरोधकांच्या हातूनही या संस्था जात आहेत. त्यामुळे त्यांनीही दिले जाते तर जाऊ दे म्हणत या निर्णयावर सहमती दर्शविली आहे.
>कर्ज मेळावे होणार
राज्यातील एकही शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, जिल्हा बँकांना शिखर बँकेमार्फत पतपुरवठा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनाही आदेश दिले आहेत. त्यासाठी जिल्हाभर कर्ज मेळावे होणार आहेत.