डिजिटल बोर्डामुळे आरोपींची ओळख
By admin | Published: May 25, 2014 01:01 AM2014-05-25T01:01:44+5:302014-05-25T01:01:44+5:30
ट्रकचालकाला मारहाण : टोळीचा म्होरक्या गजाआड
दक्षिण सोलापूर : मंद्रुप-कामती बायपासवर ट्रक अडवून लुटमार करणार्या टोळीच्या म्होरक्याला अवघ्या सहा तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे़ मंद्रुपमधील डिजिटल बोर्डवरुन झळकणारा म्होरक्या पीडित चालकाने हेरला आणि नावासह फिर्याद दिल्याने आरोपीचा छडा लागू शकला़ मंद्रुप परिसरात बायपास रोडवर शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सहा जणांनी दुचाकी आडव्या लावल्या़ ट्रक अडवून चालकाच्या खिशातील ३८ हजार ९१० रुपये हिसकावून घेतले आणि त्याला काठी, लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार ट्रकचालक जी़ नलय्या गोविंदराज यांनी सकाळी मंद्रुप पोलिसात केली़ टी़ एऩ ६०, सी़ २६३० क्रमांकाचा ट्रक गुजरातहून पाँडेचरीकडे जात होता़ मंद्रुपपासून अर्धा कि़मी़ अंतरावर ही घटना घडली़ या घटनेनंतर फिर्याद देण्यासाठी ट्रकचालक मंद्रुपमध्ये आला़ सर्व आरोपी अनोळखी असल्याने त्याच्यासमोर मोठा पेच होता़ स्टँडच्या मागे लावलेल्या सोशल ग्रुपच्या डिजिटल बोर्डावरच्या चेहर्यात साम्य वाटल्याने निसार बागवान याचे नाव संशयीत म्हणून फिर्यादीत नोंदवले़ त्यावरुन पोलिसांनी निसार बागवान आणि त्याचा साक्षीदार समीर गौस मुल्ला(दोघेही रा़ मंद्रुप) यांना सहा तासात पोलिसांनी अटक केली़ अन्य चार साथीदार फरार आहेत़
------------------------
रस्ता चोरांच्या सोयीचा तेरामैल ते कामती हा बायपास रोड अत्यंत खराब झाला आहे़ त्यामुळे वाहनांना अत्यंत धिम्यागतीने वाटचाल करावी लागते़ या निकृष्ट रस्त्याचा लाभ चोरटे घेत आहेत़ वर्षभरात खराब रस्त्याचा लाभ उठवून ट्रक अडवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़