पाणी पळवण्याचा आदेश रद्द झाल्यामुळे नामदेव पायरीवर पांडुरंगाच्या मूर्तीला अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:24 AM2021-05-20T04:24:03+5:302021-05-20T04:24:03+5:30
इंदापूरला उजनीचे पाणी देण्याबाबत सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला व खासदाराला विश्वासात न घेता २२ मार्चला याचा अध्यादेश काढून त्या ...
इंदापूरला उजनीचे पाणी देण्याबाबत सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला व खासदाराला विश्वासात न घेता २२ मार्चला याचा अध्यादेश काढून त्या कामासाठी ४०० कोटी निधीही मंजूर केला होता. याच्याविरोधात उजनी धरणामध्ये पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने जलसमाधी आंदोलन केले. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हलगीनाद आंदोलन केले होते. शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जिल्ह्यामधील वातावरण बघून महाविकास आघाडी सरकारला झुकाो लागले आणि हा आदेश रद्द केला. इंदापूरला पाणी पळवण्याचा घाट उधळून लावला असल्याचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.
यानंतर उजनी पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रभागेच्या पात्रेतून पुंडलिकाच्या पायावर पाणी घालून कावड तयार केली आणि घोषणा देत नामदेव पायरीजवळ विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीवर पाण्याने अंघोळ घातली आणि एकमेकांना पेढा भरवून जल्लोष साजरा केला. आता तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवावा, असे साकडे उजनी बचाव संघर्ष समितीने पांडुरंगाला घातले.
यावेळी दीपक भोसले, माऊली हळणवर, दीपक वाडदेकर, बापूसाहेब मेटकरी, धनाजीराव गडदे, रुक्मिणी दोलतडे, आप्पासाहेब मेटकरी यांच्यासह उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला चंद्रभागेतील पाण्याचा अभिषेक घालताना उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी दीपक भोसले, माऊली हळणवार व अन्य पदाधिकारी.