पंढरपुरातील सावळ्या विठ्ठलाची मूर्ती सप्तरंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:59 PM2019-07-10T12:59:28+5:302019-07-10T13:03:34+5:30
भक्तांना भुरळ; हैदराबादहून दाखल झाल्या फायबरच्या मूर्ती
राजकुमार सारोळे
सोलापूर : तिरुपती बालाजीच्या रंगीत मूर्तींनंतर आता हैदराबादच्या कलाकारांनी सावळ्या विठुरायाला सप्तरंगाचा साज दिला आहे. पंढरपुरातील दुकानांमध्ये दाखल झालेल्या या मूर्तींचे लोभस भक्तांना खुणावतेय.
सावळ्या रूपातील विठ्ठलाच्या मूर्ती घरोघरी दिसतील. धातू किंवा संगमरवराने बनविलेल्या या मूर्ती चांगल्याच महाग आहेत. दक्षिण भारतात गेल्यावर तिरुपती बालाजीच्या मूर्ती सप्तरंगात पाहावयास मिळतात. आता याच पद्धतीने हैदराबाद येथील कलाकारांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या फायबरच्या मूर्ती सप्तरंगात आणल्या आहेत. मूळ रूप सावळे असले तरी अंगावरील कपडे व दागिन्यांना विविध रंगांचा साज दिल्याने या मूर्ती अधिकच खुलून दिसत आहेत. पंढरपुरातील दुकानांमध्ये विविध आकारात मांडलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या या मूर्ती लागलीच नजरेत भरत आहेत. राज्यभरातून आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक या मूर्तींकडे आकर्षित होताना दिसून येत आहेत.
मूर्ती व फोटो विक्रेते धनंजय फ्रेमचे मालक प्रकाश बोडके म्हणाले की, पितळी मूर्तीपेक्षा नवीन या फायबरच्या मूर्तींना भक्तांची चांगली मागणी आहे. विठ्ठलाची व विठ्ठल-रुक्मिणीची जोडी असलेल्या वेगवेगळ्या आकारातील या मूर्ती आहेत. रंगीत मूर्ती अधिक खुलून दिसते. त्यामुळे भाविकांचे लक्ष वेधले जाते. २०० रुपयांपासून २००० पर्यंत या मूर्तींची किमत आहे. वारकरी भांडारचे भागवत बडवे यांनी साताºयाहून या मूर्ती मागविल्याचे सांगितले. पूर्वी कारमध्ये बसविण्यासाठी अशा छोट्या मूर्ती विक्रीस येत होत्या. आता भाविकांना घरी दर्शनी भागात ठेवण्यासाठी फूटभर उंचीच्या मूर्तींना पसंती आल्याने असे उत्पादन वाढले आहे.
वारकºयांची होतेय खरेदी
- आषाढी वारीसाठी दूरून आलेला वारकरी आठवण म्हणून विठ्ठलाच्या मूळ रूपातील फ्रेम किंवा मूर्ती खरेदी करतो. आम्हाला सावळ्या रूपातील विठ्ठल भावतो, अशी प्रतिक्रिया पांडुरंग पवार (परभणी) यांनी दिली. एकादशी जवळ येईल तसे पंढरपुरातील गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे यावर्षी मूर्ती विक्रीचा व्यवसाय चांगला होईल, अशी आशा व्यापाºयांना आहे.