तळघरात सापडलेल्या मूर्ती पंढरपुरातच राहणार; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक
By काशिनाथ वाघमारे | Published: June 2, 2024 07:18 PM2024-06-02T19:18:12+5:302024-06-02T19:19:57+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शन रांगेसाठी तयार करण्यात आलेल्या कायमस्वरूपी पत्रा शेडचे पत्रे आषाढी यात्रेपूर्वी बदलण्यात येणार आहेत.
सोलापूर : श्री विठ्ठल मंदिरात मिळून तळघरात सपडलेल्या सर्व मूर्ती पंढरपुरातच राहणार आहे. ज्यांना या मूर्तींचा अभ्यास करायचा आहे, ते अभ्यासक तेथे येऊन अभ्यास करतील, असा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहायक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरात घेण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, हभप ॲड. माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, हभप प्रकाश जवंजाळ, हभप शिवाजीराव मोरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
तसेच मंदिरातील संवर्धन काम करतेवेळी हनुमान गेट येथे मिळालेल्या तळघरातील मूर्ती संग्रहालयात जतन करून ठेवणे. तळघराच्या ठिकाणी माहितीची कोनशिला बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये सापडलेल्या मूर्तीदेखील संग्रहालय करून त्यात ठेवण्यात येणार आहेत. त्या मूर्ती अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. ज्यांना त्या मूर्तींबाबत अभ्यास करायचा आहे त्यांनी तेथे येऊनच अभ्यास करावा.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शन रांगेसाठी तयार करण्यात आलेल्या कायमस्वरूपी पत्रा शेडचे पत्रे आषाढी यात्रेपूर्वी बदलण्यात येणार आहेत. तसेच नव्याने दोन पत्रशेड करण्यात येणार आहेत. मंदिर समितीच्या भक्तनिवास येथील भोजनालय चालविण्यास ठेकदाराने नकार दिला आहे. यामुळे त्या ठिकाणी दुसऱ्या ठेकेदाराला भोजनालय चालविण्यासाठी देण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्याचबरोबर आषाढी यात्रेत विठोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे.
मुख्यमंत्र्यांना मंदिर समिती देणार आमंत्रण
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याचे, चौखांबी, सोळखांबी परिसरातील काम झाले आहे. मंदिरातील जतन व संवर्धनाच्या कामाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्याबाबत मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.