धरण ३३ टक्क्याच्या पुढे गेल्यास तत्काळ आवर्तन सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:36+5:302021-07-24T04:15:36+5:30
करमाळा : उजनी धरण ३३ टक्क्याच्या पुढे गेल्यास तत्काळ आवर्तन सुरू करा, थकीत ५६ लाख रुपयांचे वीजबिल भरा, अशा ...
करमाळा : उजनी धरण ३३ टक्क्याच्या पुढे गेल्यास तत्काळ आवर्तन सुरू करा, थकीत ५६ लाख रुपयांचे वीजबिल भरा, अशा सूचना आमदार संजयमामा शिंदे यांनी केल्या.
तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू करणे तसेच योजनेची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यावर संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत करमाळा येथे संपर्क कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस सिव्हिल, हायड्रो, मेकॅनिकल, एम. एस. ई. बी. तसेच दहिगाव योजनेचे कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
सध्या मावळ प्रांतात मुसळधार पाऊस सुरू आहे. उजनी धरणात पाण्याची आवक आज रोजी ६० ते ७० हजार क्यूसेक या वेगाने होत आहे. हाच पाण्याचा ओघ सात दिवस कायम राहिला तर उजनी धरण पाणीसाठा ३३ टक्क्यांपेक्षा पुढे जाईल, हे गृहीत धरून आवर्तन सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
योजनेची अपूर्ण कामे वेगाने पूर्ण करणे, कुंभेज येथील चौथा पंप बसवणे, पूर्ण दाबाने पाणी टेलला पोहोचविणे, पाणीचोरीवरती आळा घालणे, त्यासंबंधी सुरक्षेचे उपाय योजणे, निधी उपलब्ध झाल्यानंतर करावयाच्या कामाचे सर्वेक्षण करणे या विषयावर चर्चा झाली.
या बैठकीसाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जाधवर, दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता सी. ए. पाटील, शाखा अभियंता कांबळे, राजगुरू, मेकॅनिकल विभागाचे गोरे, एम. एस. ई. बी.चे भांगे, पीयूष इन्फ्राटेकचे विनायक अनवीकर, माधव सावरीकर, श्रीराम पवार उपस्थित होते.