लाखांच्या गर्दीचे इलेक्शन चालते मग पंचायत समिती निवड का रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:21+5:302021-04-09T04:23:21+5:30
माळशिरस : सध्या पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेची निवडणूक सुरू आहे. केवळ २२ मतदार असलेल्या माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची निवडणूक ...
माळशिरस : सध्या पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेची निवडणूक सुरू आहे. केवळ २२ मतदार असलेल्या माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची निवडणूक रद्द केली जाते. शासनाचे हे दुटप्पी धोरण अत्यंत चुकीचे आहे. यात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सभापती शोभा साठे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. उपसभापती निवडीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने ८ एप्रिल ही तारीख निश्चित केली होती. त्यानुसार गुरुवारी नूतन उपसभापतीची निवड होणे अपेक्षित होते. पंचायत समिती स्तरावर सर्व तयारीही झाली होती. मात्र, ५ एप्रिल रोजी आलेल्या नवीन अध्यादेशानुसार ही निवडणूक घेता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माळशिरस पंचायत समितीला ७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कळविण्यात आले.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, माजी उपसभापती किशोर सूळ, गटनेता प्रतापराव पाटील उपस्थित होते.
---
०८ माळशिरस १
उपसभापतीची निवडणूक घेण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देताना पंचायत समिती सभापती व मान्यवर.