शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम दिल्यास अभियांत्रिकी महाविद्यालयांना ऊर्जितावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:38 PM2021-01-20T12:38:17+5:302021-01-20T12:38:23+5:30
पहिल्या फेरीअखेर निम्म्यापेक्षा अधिक जागा रिक्त
रुपेश हेळवे
सोलापूर : शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्यास परवानगी दिली. पण, अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय होत नसल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. याचबरोबर शासनाकडून मागील काही वर्षांची शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांना न मिळाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थकारण बिघडले आहे. यामुळे महाविद्यालय सुरू करण्याबरोबर शिष्यवृत्तीची रक्कम लवकर मिळणे गरजेचे आहे, असे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यात १४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत़ यात काही महाविद्यालये हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित आहेत तर काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठ, लोणेरे यांच्याशी संलग्नित आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्यामुळे प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. काही महाविद्यालयांत कंत्राटी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. सध्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या फेरीअखेर जवळपास २१०० जागांवर प्रवेश झाले आहेत. यात स्वेरी कॉलेजमध्ये ४४६, वालचंदमध्ये ३२३ आणि कोर्टी येथील सिंहगड महाविद्यालयात २५९ प्रवेश झालेले आहेत.
कोरोनामुळे सर्वच क्षेत्राप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही मोठा फटका बसला आहे़ विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपची रक्कम महाविद्यालयांना न मिळाल्यामुळे महाविद्यालयांवर आर्थिक ताण पडत आहे. सोबतच कोविड योद्धा विद्यार्थी आणि प्राध्यापकांना लस देऊन महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे मत प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी व्यक्त केले.
महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळत नाही. त्यांना मोबाईलवरील शिक्षणावरच समाधान मानावे लागत आहे. यामुळे मुले उत्तीर्ण होतील, पण प्रात्यक्षिक शिक्षणात अडचणी येतील. यामुळे महाविद्यालय लवकर सुरू होणे गरजेचे आहे, असे मत सिहंगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर नवले यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शैक्षणिक संस्थांमधील अर्थकारण बिघडल्याचे दृष्टीस पडते. यामधील प्रामुख्याने घटक हे संस्थाचालक, प्राध्यापक-शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी अशा अनुषंगाने या आर्थिक गणिताचा तोल सांभाळणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे हे अर्थगणित विद्यार्थ्यांची फी आणि राज्य शासनाद्वारे, विविध स्कॉलरशिपद्वारे प्राप्त होणारी रक्कम यावर अवलंबून आहे. त्यायोगे शैक्षणिक अंगाने होणारा खर्च व संस्थेमधील शिक्षक प्राध्यापक कर्मचाऱ्यांचे वेतन या गोष्टी अवलंबून आहेत. शासनाकडून मागील काही वर्षांची शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांना न मिळाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थकारण बिघडले आहे.
- डॉ.नरेंद्र काटीकर,
सदस्य, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली
कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाली बिनपगारी सुटी
काही महाविद्यालयांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुटी देण्यात आलेली आहे. यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच काही महाविद्यालयांनी कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देऊ शकले नाही. यामुळे आमचे कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत.