‘मी असते तर अवधूतने आत्महत्या केली नसती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 02:07 PM2019-06-03T14:07:54+5:302019-06-03T14:09:32+5:30
युवकाच्या आत्महत्येनंतर प्रेयसी थेट अक्कलकोट पोलीस ठाण्यात
दुधनी : दोन दिवसांपूर्वी टिळक गल्लीतील तरुणाने प्रेमप्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, घटनेनंतर ती मुलगी पोलीस ठाण्यात दाखल होऊन ‘मी अक्कलकोटमध्ये असते तर अवधूतने आत्महत्या केली नसती’, असं सांगत भावनेला वाट मोकळी करून दिली.
अवधूत तुळशीराम आवटे (वय २३, रा. टिळक गल्ली, अक्कलकोट) याचे एका युवतीबरोबर दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याची कल्पना मुलीच्या आई-वडिलांना होती. दोघेही लग्न करणार होते. परंतु ‘आधी करिअर करू, नंतर लग्न करू’ अशी भावना त्या मुलीची होती. मात्र युवकाला लग्नाची घाई होती. शिवाय ती मुलगी अल्पवयीन होती. दोघे सतत एकमेकांना भेटत होते. ती बाहेरगावी शिकत होती तर अवधूत अक्कलकोट येथे बी. कॉम. च्या दुसºया वर्षात शिकत होता. दोघे सतत फोनवर संपर्कात असायचे.
आत्महत्या करण्याअगोदर अवधूतने बाहेरगावी जाऊन त्या मुलीची भेट घेतली होती. तिला अक्कलकोटला ये म्हणून त्याने विनंती केली होती. मात्र नकार दिल्याने अवधूत तिच्याशी भांडला होता. याच संतापाच्या भरात त्याने अक्कलकोटला येऊन प्रेयसीचा फोटो व चिठ्ठी स्वत:जवळ ठेवून आत्महत्या केली.
मुलीनेही केला आत्महत्येचा प्रयत्न
अवधूत आवटे याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच प्रेयसीने शनिवारी पहाटे उत्तर पोलीस ठाणे गाठून तपास अधिकाºयासमोर भावनेला वाट मोकळी करून दिली आणि आत्महत्या करण्याची भाषा वापरत ती पोलीस ठाण्यातून पळून जाऊ लागली. दरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधानता बाळगत त्या मुलीच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तिची समजूत काढली आणि तिला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. मुलाच्या घरासमोर जाऊन काहीवेळ ती रडतही बसली.