बिबट्या सापडला नाही तर हेलिकाॅप्टरची मदत घेऊ : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:37 AM2020-12-12T04:37:52+5:302020-12-12T04:37:52+5:30

पालकमंत्री भरणे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील कुटुंबाची भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा ...

If leopard is not found, let's take the help of helicopter: Guardian Minister | बिबट्या सापडला नाही तर हेलिकाॅप्टरची मदत घेऊ : पालकमंत्री

बिबट्या सापडला नाही तर हेलिकाॅप्टरची मदत घेऊ : पालकमंत्री

Next

पालकमंत्री भरणे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील कुटुंबाची भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्तात्रय सररडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, मोहोळ वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, अंजनडोहचे सरपंच विनोद जाधव, पोलीसपाटील अंकुश कोठावळे, जि. प. सदस्य सवितादेवी राजेभोसले, जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे, शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड, राजेंद्रसिंह राजेभोसले, बिभीषण आवटे उपस्थित होते.

पालकमंत्र भरणे म्हणाले, तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन व्यक्तींचा जीव गेला ही दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण शासन यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे. वनविभाग आणि शासकीय यंत्रणांनी बिबट्याला त्वरित जेरबंद करावे किंवा ठार मारावे. या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी नागपूर वनविभागाकडून मिळवली आहे. या भागात चार-पाच बिबटे असण्याची शक्यता आहे, मात्र सर्व हल्ले करीत नाहीत. संबंधित बिबट्याला कोठेतरी जखम झाली असेल, त्यामुळे तो मानवावर हल्ले करून ठार मारत आहे, असे त्यांनी सांगितले.

वीज वितरण कंपनी आणि वनविभागाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी उपाययोजना करावी. डिसेंबरअखेर फीडरचा विषय मार्गी लावून दिवसा वीज मिळेल. अंजनडोहच्या शिंदे वस्तीवर महावितरणने माणुसकीच्या नात्याने पोलची व्यवस्था करून वीज द्यावी, असे निर्देशही भरणे यांनी यावेळी दिले.

आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी बिबट्याचा ठावठिकाणा समजले तिथे शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, यासाठी वनविभाग आणि महावितरणने समन्वय साधावा. फीडरनिहाय जो बदल करायचा तो करून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावी.

अधीक्षक अभियंता पडळकर म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणची टीम काम करीत आहे. कटफेज टाकून दिवसा वीज देता येईल. शेतकऱ्यांनी शेतीपंपाला कपॅसीटर बसवावे. यामुळे कमी व्होल्टेज असेल तर समस्या येणार नाही. कायमस्वरूपी दिवसा वीज देण्यासाठी अपारंपरिक विजेची तरतूद आहे. त्यानुसार गायरान किंवा शासकीय जमिनींचा शोध सुरू असून, त्या ठिकाणी सौर प्रकल्प उभारून दिवसा वीज देण्याचा प्रयत्न महावितरण करीत आहे.

उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील म्हणाले, हा नरभक्षक बिबट्या एका ठिकाणी दिसत नाही. बिबट्या रोज ठिकाण बदलत असल्याने आणि या परिसरात ऊस, केळीची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने पकडणे अवघड जात आहे. मात्र २१ पिंजरे, तीन ड्रोन कॅमेरे, ४२ ट्रॅप कॅमेरे, पाच शार्पशूटर, बेशुद्ध करणारे दोन पथक, एक डॉग स्वॉड अशा वेगवेगळ्या १६ टीम रोज दिवसरात्र कोम्बिंग ऑपरेशन करीत आहेत. याकामी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणेची मदत होत असून, राज्य राखीव पोलीस दलाचीही मदत घेण्यात येणार आहे.

हारचंद कोटली या ऊसतोड कामगाराची ७ वर्षीय मुलगी फुलाबाई हिला बिबट्याने ठार मारले. पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते कोटली कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला.

--------

बिबट्याच्या हल्ल्यातील शिंदे परिवारातील एकास नोकरी

अंजनडोह येथील शिंदे वस्तीवरील जयश्री दयानंद शिंदे (वय-३०) या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शिंदे यांची भेट देऊन सांत्वन केले. जयश्री यांच्या पतीला वनविभागात नोकरी देण्याचे आश्वासन दिले. मृत जयश्री यांचे पती दयानंद धर्मराज शिंदे यांना व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी देण्याची मागणी केली. जयश्री यांना कार्तिकी (वय १० वर्षे), दिव्या (वय-८वर्षे) आणि सोहम (वय-४वर्षे) अशी मुले आहेत. आईच्या मृत्यूने ती वडिलांना बिलगली होती. शिंदे कुटुंबीयांना यापूर्वी पाच लाखांचा धनादेश वनविभागातर्फे देण्यात आला आहे.

फोटो

११करमाळा-पालकमंत्री

ओळी

अंजनडोह, ता. करमाळा येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे. समवेत आमदार संजयमामा शिंदे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी शंभरकर, पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते.

Web Title: If leopard is not found, let's take the help of helicopter: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.