coronavirus; नवीन कैद्याचा संशय आल्यास जेलमध्ये पाठवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 01:18 PM2020-03-17T13:18:19+5:302020-03-17T13:21:02+5:30
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्याला हजर करण्याच्या परवानगीसाठी न्यायाधीशांना दिले पत्र
संताजी शिंदे
सोलापूर : कोरोना व्हायरस हा जगभर चर्चेचा विषय ठरत असताना, नवीन कैद्याचा संशय आल्यास त्याला कारागृहात पाठवण्यात येऊ नये त्याला शासकीय रुग्णालयातच दाखल करण्यात यावे अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. आतमध्ये असलेल्या कैद्यांना न्यायालयात ने-आण करण्यापेक्षा, त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे हजर करण्याची परवानगी देण्यात यावी असे पत्र जिल्हा न्यायाधीशांना कारागृह (जेल) अधीक्षकांनी दिले आहे.
कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात ठिकठिकणी आढळून येत आहेत, तो महाराष्ट्रातही येऊन पोहोचला आहे. सोलापुरात दाखल झालेल्या संशयितांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याची दखल घेत कारागृहात असलेल्या कैद्यांना याची बाधा होऊ नये म्हणून तुरुंग अधीक्षकांनी काळजी घेतली आहे. कारागृहात बाहेरून येणाºया नवीन कैद्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. संशय आल्यास अशा कैद्यांना कारागृहात पाठवण्यात येऊ नये, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात यावे अशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांना तुरुंग अधीक्षकांनी दिल्या आहेत. नवीन कैद्यांसाठी एक बकेट व हॅन्डवॉश ठेवण्यात आले आहे.
कोरोना व्हायरस संदर्भात जिल्हा कारागृह (जेल) मध्ये जनजागृतीपर भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. अधूनमधून हात धुवा, स्वच्छता बाळगा अशा सूचना कैद्यांना देण्यात आल्या आहेत. खटल्यादरम्यान दररोज कैद्यांना न्यायालयासमोर हजर करावे लागते, त्यामुळे त्यांचा संपर्क बाहेरील व्यक्तींशी येतो. कोरोना व्हायरसमुळे कैद्याला नेणे व आणणे करण्यापेक्षा त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जाईल. तशी परवानगी न्यायालयाने द्यावी असे पत्र जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आले आहे.
दररोज एक डॉक्टर तपासणीसाठी कारागृहात पाठवा
कैद्यांना तपासण्यासाठी आठवड्यातून दोन डॉक्टर कारागृहात येत असतात. सध्याची स्थिती पाहता, दररोज एक डॉक्टर कारागृहात पाठवण्यात यावा अशी मागणीही तुरुंग अधीक्षकांनी शासकीय रुग्णालयाकडे केली आहे.
कारागृहात सध्या ४५५ कैदी
जिल्हा कारागृहात सध्या एकूण ४५५ कैदी आहेत, यापैकी ४२१ पुरुष आहेत. ३४ महिला आहेत. कैद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कारागृह अधीक्षक, एक वरिष्ठ तुरुंग अधिकारी, तीन तुरुंग अधिकारी श्रेणी-२ व अन्य हवालदार व शिपाई असा एकूण ६० अधिकारी व कर्मचारी आहेत.
तुरुंगातील सर्व कैद्याची आम्ही काळजी घेत आहोत, दररोज एका डॉक्टरची भेट व्हावी म्हणून शासकीय रुग्णालय प्रशासनाला पत्र दिले आहे. कैद्याला कोठूनही संसर्ग जडणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेत आहोत.
-डी.एस. इगवे, तुरुंग अधीक्षक,