सांगोला तालुक्यातून प्रस्ताव आल्यास दोन दिवसांत टँकर सुरू करू - आ. गणपतराव देशमुख यांची आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:50 PM2018-10-13T12:50:41+5:302018-10-13T12:58:09+5:30
सांगोला तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक आ. गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सांगोला : सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ चारा व पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़ मागणीचे प्रस्ताव आल्यास दोन दिवसांत टँकर सुरू करावेत. अधिकारी व कर्मचाºयांनी गाफील न राहता आवश्यक त्या उपाययोजना वेळीच पूर्ण कराव्यात, अशा सूचना आ़ गणपतराव देशमुख यांनी अधिकाºयांना दिल्या.
तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक आ. गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते़ या बैठकीस प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, सभापती डॉ. श्रुतिका लवटे, उपसभापती शोभा खटकाळे, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, झेडपी सदस्य अॅड. सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, तानाजी पाटील, चंद्रकांत शिंदे, अशोक शिंदे, शहाजीराव नलवडे, बाळासाहेब काटकर, गिरीश गंगथडे, माजी सभापती मायाक्का यमगर उपस्थित होते.
आ. गणपतराव देशमुख यांनी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती, वाड्या-वस्त्यांवर योजनांची कामे चालू आहेत का, याविषयी माहिती घेतली़ कृषी विभागाकडून खरीप व रब्बी पिकांच्या परिस्थितीची माहिती घेऊन मागेल त्याला शेततळे या योजनेतून प्रत्येक गावाने पाच शेततळ्यांचे प्रस्ताव द्यावेत, अशा सूचना केल्या. यावेळी जलसंधारणाच्या पाझर तलाव, सिमेंट बंधाºयाविषयी माहिती घेतली. टेंभूतून बुद्धेहाळ तलावात किती पाणी आले, या योजनेतून बलवडी व नाझरे येथील बंधारे भरून देण्याविषयी सूचना केल्या.
गटविकास अधिकारी संतोष राऊत म्हणाले, २०१९ पर्यंत ९२ टँकर उपलब्ध करण्याबरोबर विहीर खोदाई, गाळ काढणे, अधिग्रहण, हातपंप या योजनांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात ३ लाख ६२ हजार जनावरांसाठी पुढील तीन महिने पुरेल इतका २८ लाख १८ हजार ३१९ क्विंटल चारा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील क्षेत्र रब्बीचे असून, पावसाअभावी पेरण्या झालेल्या नसल्याने दुष्काळ जाहीर करावा. पशुधन जगविण्यासाठी तत्काळ चारा डेपो सुरु करावेत, परिस्थितीनुसार छावण्या उघडाव्यात. टेंभू, म्हैसाळ योजनांची कामे मुदतीत पूर्ण करावीत. टेंभू व म्हैसाळ योजनेतून माण, कोरडा नदीवरील बंधारे, पाझर तलाव भरून द्यावेत. गावात मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी पाणंद रस्ते, विहिरी, शेततळे या कामांचे जास्तीत जास्त प्रस्ताव द्यावेत, हे ठराव करण्यात आले.