Lokmat Special; सोलापुरी मुछें हो तो अभिनंदन जैसी..!
By appasaheb.patil | Published: March 3, 2019 09:03 PM2019-03-03T21:03:56+5:302019-03-03T21:05:53+5:30
सोलापूर : पाकिस्तानातून परतलेले अभिनंदन वर्धमान हे सध्या जेवढे चर्चेत आले, तेवढ्याच त्यांच्या मिशाही लोकप्रिय ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ...
सोलापूर : पाकिस्तानातून परतलेले अभिनंदन वर्धमान हे सध्या जेवढे चर्चेत आले, तेवढ्याच त्यांच्या मिशाही लोकप्रिय ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील अशा वेगळ्या मिशीधारी मंडळींचा ‘लोकमत’ टीमनं घेतला शोध. या मिशा वर्षानुवर्षे जपण्यासाठी त्यांना किती करावी लागली यातायात, याचीही घेतली माहिती.
सहकारमंत्र्यांचा मिशीवाला पीए
वडिलांची इच्छा होती की, मिशा राखाव्यात म्हणून मी मिशा ठेवण्यास सुरुवात केली आता माझी ओळख फ्रेंचकट असलेला पीए अशी झाली आहे, असे सांगतात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे स्वीय सहायक असिफ महंमद युसूफ शेख. पत्नी, घरातील लोक अन् मित्रही मिशांचा लूक चांगला असल्याने चेहºयाला वेगळेपण आल्याचे सांगतात. मला मिशावाला पीए म्हणून ओळखतात. मी जरी मिशा काढायचे म्हटले तर घरचे लोक काढू देत नाहीत.
मिशीची स्टाईल आजोबांसारखीच
माझ्या मिशीला पत्नीने एकदाच विरोध केला होता. पण ‘मिशी माझी शान आहे’ असे तिला सांगितले. त्यानंतर मात्र पत्नीने कधी विरोध केला नाही. ही मिशी आणखी भरदार करणार आहे, असे कुमठ्यातील रामचंद्र शिवशरण सांगतात. शेतीकाम करणारे व ट्रॅक्टर चालक असलेले ३६ वर्षीय रामचंद्र यांनी गेल्या चार वर्षांपासून या स्टाईलची मिशी ठेवली आहे. त्यांच्या आजोबांच्या मिशाही भरदार होत्या. त्या पाहूनच त्यांनीही मिशीची स्टाईल ठेवली.
खाकीतल्या ‘सिंघम’ला लोकांचा सॅल्युट
कारंबा येथील ग्रामीण पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर काम करणारा सुहास नारायणकर हा मिशीमुळे ‘सिंघम’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला आहे़ शहीद पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्याप्रमाणेच त्याने आपल्या डोक्यावर टक्कल ठेवले आहे. शिवाय मिशीही ठेवली आहे़ मागील दोन दिवसांपासून अभिनंदन यांचा विषय चर्चेत आल्यापासून सुहासकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला आहे़ दोन दिवसांपासून सुहास यास ‘तू अभिनंदनसारखा दिसतोच, तुलाही सलाम आम्ही करतो,’ असे कित्येक मित्रांनी प्रतिक्रिया दिली़
मिशांसाठी महिन्याला अडीच हजार खर्च
मिशांचा आकार बदलू नये, यासाठी गुरुद्वारा असलेल्या ठिकाणांहून म्हणजे नांदेड, बीदर येथून खास जेल मागवतो. महिन्याकाठी दाढी अन् मिशाला कट मारण्यासाठी अडीच हजार रुपये खर्च येतो, असे फेटे बांधणारे क्षत्रिय गल्लीतील राजू पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राजू म्हणाले, मी ४० वर्षांपासून ही आगळी-वेगळी मिशी ठेवली आहे. आजपर्यंत कधीच याचा आकार चुकविला नाही. एक-दोन दाढी घरी करतो आणि जेव्हा मिशाला आकार द्यावयाचा असतो त्यावेळी मी खास दुकानात जाऊन मिशाला आकार देतो.
मिशीसाठी रोज सलूनमध्ये
कितीही गर्दी असो... त्या गर्दीत माझी मिशीच माझी ओळख असते. आता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यामुळे माझी ही मिशी लोकप्रियच होईल, असे बांधकाम व्यावसायिक भागवत जेटिंगा जोगधनकर यांनी सांगितले. रोजच्या रोज दाढी करतो. सलून दुकानदारही ठरलेला. मिशीला चांगला आकार मिळावा म्हणून मी दाढी घरात कधीच करीत नाही. दुकानदारही खूप वेळ देत माझी मिशी कशी उठावदार दिसेल, याकडे कटाक्षाने पाहतो.
आकार देण्यासाठी रोज अर्धा तास
पोलीस दलात नियुक्त झाल्यावर मी माझ्या मिशीला वेगळा आकार दिला. १६ वर्षांपासून मी या मिशीची ठेवण बिघडू दिली नाही, अशी माहिती ग्रामीण पोलीस दलातील कॉन्स्टेबल प्रशांत सुरवसे यांनी दिली. मी दररोज सकाळी दाढी करतो. घरातच दाढीचे साहित्य असल्याने अर्धा तास यासाठी मी वेळ देतो. दाढी करताना मिशीला कुठेच धक्का लागणार नाही, याची काळजी घेतो. गालापर्यंत आलेल्या मिशीला आकार देताना बारकावे पाहावे लागतात, असेही ते म्हणाले.