जमीनीला योग्य भाव न दिल्यास, शेतकरी छातीवर गोळ्या झेलायला तयार!; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:55 PM2023-02-28T18:55:32+5:302023-02-28T18:55:47+5:30
समृद्धी महामार्गा प्रमाणे सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादीत करण्यात येणाऱ्या जमीनीला दर देण्यात यावा, अन्यथा शेतकरी छातीवर गोळ्या झेलायला तयार असल्याची मानसिकता शेतकऱ्यांनी पत्रकारांना बोलून दाखवली.
संताजी शिंदे
सोलापूर : समृद्धी महामार्गा प्रमाणे सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादीत करण्यात येणाऱ्या जमीनीला दर देण्यात यावा, अन्यथा शेतकरी छातीवर गोळ्या झेलायला तयार असल्याची मानसिकता शेतकऱ्यांनी पत्रकारांना बोलून दाखवली. या बाबत जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी निवेदन देवून तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली.
केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाने सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हा महामार्ग करण्यात येणार आहे. हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या तीन तालुक्यातून जात असून यामध्ये ३७ गावातील शेती बाधीत होणार आहे. महामार्गासाठी जमीनीची मोजणी झाली आहे, सध्या त्याच्या नोटीसा देण्याचे काम सुरू आहे. मात्र शासनाने एकरी सव्वा तीन लाख रूपये इतका दर काढला आहे. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही अशी भूमिका घेऊन संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.
संघर्ष समितीचे पदाधिकारी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले, माजी मंत्री सिद्धाराम म्हत्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. जमीनीच्या दराबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांनी या पूर्वी अक्कलकोट तालुक्यात यापूर्वी सोलापूर ते अक्कलकोट आणि अक्कलकोट ते गुलबर्गा हा महामार्ग पूर्ण झाला आहे. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला देण्यात आला आहे. एका एकरला एक ते दिड कोटी रूपयाचा मोबदला देण्यात आला आहे. मात्र सुरत-चेन्नई हा रस्ता अक्कलकोट मधूनच जात आहे. मात्र संपादित होणाऱ्या जमिनीचा दर अत्यल्प असून कवडीमोल रक्कम देण्याची नोटीस शासनाकडून देण्यात येत आहे असे निवेदन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक घेण्याचे अश्वासन
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे, रेडीरेककनुसार दर कसा देण्यात आला याची माहिती शेतकऱ्यांना दिली. मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी येत्या दिवसात बैठक घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे अश्वासन दिले.
शेतकऱ्यांनी घेतली गडकरी यांची भेट : सिद्धाराम म्हेत्रे
शेतकऱ्यांनी मागील दिवसामध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे. त्यांनी दरा बाबत जिल्हाधिकारी यांना भेटा माहिती द्या त्यांच्याडून प्रस्ताव येऊ द्या मग त्यावर निर्णय घेऊ असे अश्वासन दिले आहे. वास्तविक पाहता औरंगाबाद खंडपिठामध्ये असाच एक खटला होता, त्यामध्ये शासनाला शेतकऱ्यांच्या विरूद्ध बाजू मांडता आली नाही. सुरत-चेन्नई महामार्गामध्ये असाच प्रकार आहे. येत्या चक्का जाम आंदोलनात मी स्वत:ही सहभागी असणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आत्मदहना सारखे प्रकार घडतील : बाळासाहेब मोरे
समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रीयेत ज्या पद्धतीने पाच पट नुकसानभरपाई देण्यात आली होती. त्या पद्धतीने सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डमध्ये देण्यात यावी. अन्यथा भविष्यात सनदशीर मार्गाने रास्तारोको, उपोषण, आत्मदहन सारखे प्रकार घडतील असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिला.