चंद्र दिसला तर मंगळवारी नाहीतर गुरूवारी होईल रमजान ईद साजरी
By Appasaheb.patil | Updated: April 5, 2024 19:20 IST2024-04-05T19:19:53+5:302024-04-05T19:20:23+5:30
ईदच्या निमित्तानं बाजारात देखील उत्साह असून खरेदीसाठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे

चंद्र दिसला तर मंगळवारी नाहीतर गुरूवारी होईल रमजान ईद साजरी
सोलापूर: चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद उल फित्र (रमजान ईद) साजरी होणार असल्याचे शहर काझी मुफ्ती काझी सय्यद अमजद अली यांनी कळविले आहे. मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी चंद्रदर्शन झाल्यास १० एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होईल. मंगळवारी चंद्रदर्शन न झाल्यास ३० रोजे पूर्ण होत असल्याने गुरुवार, दि. ११ एप्रिल रोजी रमजान ईद साजरी करावी असे शहर काझी यांनी सांगितले.
ईदच्या निमित्तानं बाजारात देखील उत्साह असून खरेदीसाठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे. ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय. इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट या ईदने होतो. सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर मित्र परिवार व नातेवाईकांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते.
याठिकाणी होणार नमाज पठण
पानगल हायस्कूल येथील शाह आलमगीर इदगाह येथे साडे आठ वाजता, आलमगीर इदगाह (होटगी रोड) येथे सकाळी साडे आठ वाजता आणि आदिल शाही इदगाह (जुनी मिल कंपौंड) येथे साडे नऊ वाजता नमाज पठण करणार असल्याचे काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.