कॅमेऱ्यासमोरुन विद्यार्थी दोनदा हलला तर नापासच! प्रथमच 'ॲन्ड्राईड वेब'चा वापर
By शीतलकुमार कांबळे | Published: June 13, 2024 01:45 PM2024-06-13T13:45:11+5:302024-06-13T13:50:21+5:30
२१ जुलै रोजी पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा
शीतलकुमार कांबळे, सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची 'पीएच.डी. प्रवेशपूर्व पेट-९ परीक्षा २१ जुलै २०२४ रोजी होणार आहे. यंदा प्रथमच ही परीक्षाऑनलाइन माध्यमातून ॲन्ड्राईड वेब बेस्ड पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली. विद्यार्थी कॅमेऱ्यासमोरुन दोनदा हलला तर त्याला बाद ठरविण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या संशोधन विभागाकडून पीएच.डी. प्रवेशासंदर्भात प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याकरिता १३ जून ते ६ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज भरावे लागणार आहे. यंदा ही परीक्षा ऑनलाइन अँड्रॉइड बेस्ड पद्धतीने होणार असल्याने परदेशातील विद्यार्थ्यांसह देशांतर्गत कोणत्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाची 'पेट' देता येणार आहे.
विद्यापीठात यावेळी 'पीएच.डी'साठी ४७४ जागा आहेत. विषयनिहाय संशोधक मार्गदर्शकांची यादी ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 'पेट'साठी दोन पेपर असतात, त्यातील पहिला रिसर्चचा पेपर सकाळच्या सत्रात तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे.
प्रत्येकी एक तासाचा वेळ
विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या ॲन्ड्राईड मोबाइल, संगणक किंवा लॅपटॉपवरूनही परीक्षा देता येणार आहे. पण, कॅमेऱ्यासमोरून दोनदा विद्यार्थी हलला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरविला जाणार आहे. पेपर सोडविण्याची प्रत्येकी एक तासाचा वेळ असणार आहे.