वेळीच ट्रामा सेंटर पूर्ण झाले असते तर अनेकांचे जीव वाचले असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:08+5:302021-05-18T04:23:08+5:30
अक्कलकोट : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील ट्रामा केअर सेंटरचे काम चार वर्षांपासून रखडले आहे. वेळीच हे काम पूर्ण ...
अक्कलकोट : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील ट्रामा केअर सेंटरचे काम चार वर्षांपासून रखडले आहे. वेळीच हे काम पूर्ण झाले असते तर आजच्या कोरोनाच्या महामारीत शेकडो लोकांना दिलासा मिळात असता. अनेकांचे जीव वाचले असते. अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
८ जुलै-१६ मध्ये संबंधित मंदीत ठेकेदार लोकमंगल डेव्हलपर्स सोलापूर यांना काम मिळाले आहे. तेव्हापासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. काम वेळेत पूर्ण करून घेण्याचे सर्वस्वी जबाबदार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे चार वर्षांपासून हे काम रखडले आहे. ट्रामा केअर सेंटर वेळेत पूर्ण झाले असते, तर कोरोना कालावधीत १०० हून अधिक लोकांचे जीव वाचले असते. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार व प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
तालुक्याची लोकसंख्या ३ लाखांहून अधिक आहे. अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उत्तम असणे आवश्यक आहे. या व्यवस्थेचा सगळा भार ग्रामीण रुग्णालयावर पडत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे व स्वामी भक्तांचे आरोग्याचे सोय व्हावी म्हणून २ कोटी ३१ हजार ९७० रुपयांच्या ट्रामा केअर सेंटरला शासनाने निधी दिला. त्याच्या मंजुरीसाठी तत्कालीन आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठपुरावा केला होता. हे ट्रामा केअर १८ महिन्यांत पूर्ण होणे गरजेचे होते.
याबाबत लोकमंगल डेव्हलपर्सला २०१९ साली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी नोटीस बजावलेली आहे. एकीकडे शासन नागरी सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. त्याच ठिकाणी आरोग्यासारख्या गंभीर विषयाचे काम चार वर्षांपासून रखडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या बाबीकडे लक्ष देऊन एक महिन्याच्या आत काम पूर्ण करून अक्कलकोटकरांच्या सेवेत दाखल करावे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचे इशारा सचिन स्वामी, मळसिद्ध कांबळे, महादेव बिराजदार यांनी दिला आहे.
----
ट्रामा केअरमध्ये आयसीयूसह, ५० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल. त्यामध्ये किमान तीस ऑक्सिजन बेड आहेत. त्याशिवाय व्हेंटिलेटर, एक्स-रे मशीन, ऑपरेशन थिएटर, एम.डी., एमबीबीएस, बीएएमएस अशा दर्जाच्या डॉक्टरचा देखील यात समावेश आहे. किमान ५० जणांचा स्टाफ या हॉस्पिटलमध्ये असणार आहे. ट्रामा केअर सेंटरचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ २० टक्के काम बाकी आहे. जर हे काम पूर्ण झाले तर सिव्हिल हॉस्पिटलसारखी जम्बो इमारत अक्कलकोटकरांच्या सेवेत दाखल होऊ शकते.
----
अनेक दिवसांपासून या कामासाठी पाठपुरावा करत आहे. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनाही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. ते याबाबतीत सकारात्मक आहेत. हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर कोरोनामध्ये १०० हून अधिक लोकांचे बळी गेले नसते.
- अशपाक बळोरगी, पक्षनेते,
अक्कलकोट नगरपालिका
----
माझ्याकडे नुकताच चार्ज आला आहे. यापूर्वी लॉकडाऊनमुळे वेळेवर मटेरियल मिळाले नाही. म्हणून उशीर होत आहे. आता एका महिन्यात काम पूर्ण होईल. काम पूर्ण करण्याची मुदत संपल्याने त्या ठेकेदारास पाच नोटिसा बजावल्या आहेत. तसेच नियमानुसार त्या कामाला मुदत वाढ दिली आहे.
- रघुनाथ ढाळे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अक्कलकोट
-----