महामार्गावरील वाहनधारकाने मास्क न घातल्यास होणार १ हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 05:22 PM2021-12-07T17:22:08+5:302021-12-07T17:22:14+5:30
पोलीस अधीक्षकांची माहिती; प्रमाणापेक्षा जादा प्रवासी वाहतूकदारांवरही होणार कारवाई
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाने अधिक कडक नियम केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी फिजिकल डिस्टन्सचे पालन व्हावे, अपघाताच्या संख्येत घट व्हावी, अपघातातील मृतांची संख्या कमी व्हावी यासाठी प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवासी गाड्या, बस व अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. शिवाय मास्क न घालणाऱ्या वाहनधारकांना १ हजार, तर गाडीतील प्रवाशांना ५०० रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.
राज्यात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे विविध नियम, निर्बंध कडक करण्यात येत आहेत. एसटी कर्मचाऱ्याची बंद पुकारला आहे. प्रवाशांच्या गैरसोय टाळण्यासाठी शासनाने खासगी वाहनांना एसटी बसस्थानकातून प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली. या संधीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी वाहतूक चालक प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत असल्याची बाब समोर आल्याचे दिसून येताच पोलीस अधीक्षक सातपुते यांनी अशा नियमबाह्य व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
----------
अशी आहेत वाहने...
- खासगी प्रवासी वाहने - ३९६
- टुरिस्ट/ टॅक्सी - ११२९
- काळी/पिवळी टॅक्सी - १२
- परवानाधारक ऑटोरिक्षा -१२ हजार २५५
- स्कूल बस - ५०४
---------
मास्क घाला अन्यथा दंड...
वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. जर वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी मास्क न घातल्यास वाहतूक पोलीस व संबंधित जिल्हा प्रशासनाचे अधिकारी विनामास्क वाहन चालविणे व विनामास्क प्रवास करणे या नियमांखाली १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश दिल्याचेही पोलिसांनी सांगितले.
----------
प्रति प्रवासी ५०० दंड
प्रमाणापेक्षा अधिक क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार आठ सीटची क्षमता असेल तर ९ किंवा १० प्रवासी त्या गाडीत चालतील, मात्र १२ ते १६ प्रवासी बसले असतील तर ते चुकीचे आहे. त्यामुळे त्या वाहनधारकांवर कारवाई होणारच. प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी वाहतूकदारास प्रति प्रवासी ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.
---------
जिल्ह्यातील अपघातांची संख्या कमी व्हावी या दृष्टीने प्रमाणापेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. शिवाय कोरोना नियमांचे पालन करणाऱ्या वाहनांवरही ग्रामीण पोलिसांकडून कारवाई नियमितपणे सुरू आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.