तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत असाल तर मीही जय महाराष्ट्र म्हणतो : दिलीप सोपल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:46 PM2019-08-05T13:46:55+5:302019-08-05T13:50:02+5:30
मी पक्षामुळे नव्हे तर बार्शीकरांच्या प्रेमामुळे आमदार झालोय असे स्पष्ट मत माजी आमदार दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
बार्शी : गेली ३५ वर्षे संसदीय राजकारणात मी सक्रिय आहे. मला घर, प्रपंच नसल्यानं, लोकांच्या गाठीभेटी आणि त्यांची कामं हाच माझा उद्योग आहे. मला पक्षप्रवेशासाठी सर्वच राजकीय पक्षांतून आॅफर आहे. त्यामुळे त्यासंदर्भात आपले मत विचारात घेण्यासाठी मी आलोय, असे सांगत, मी कोणत्या पक्षामुळे नव्हे तर बार्शीकरांच्या प्रेमामुळे आमदार झालोय, असे स्पष्ट प्रतिपादन आ़ दिलीप सोपल यांनी केले़
सोलापूर मराठवाडा मित्रमंडळ, बार्शीकर मित्रमंडळ, पिंपरी-चिंचवड आयोजित स्नेहमेळाव्यात आमदार सोपल बोलत होते. यावेळी अध्यक्ष प्रशांत जाधव, उद्योजक हनुमंत गटकळ, हेमंत गडशिंग, भाऊसाहेब कोकाटे, फफाळ उपस्थित होते़ महाराष्ट्रात पसरलेल्या बार्शीकरांना मी भेटत असतो, त्यांची प्रगती पाहून आनंद होतो, असे सोपल यांनी म्हटले.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांतून मला आॅफर आहे. मात्र, आपलं मत विचारात घ्यायला मी आलोय. बार्शीकरांच्या प्रेमामुळे आमदार झालो आहे. म्हणूनच दोनवेळा अपक्ष निवडून आलो. त्यामुळे कार्यकर्ता आणि जनमत चाचपणी करूनच आपण निर्णय घेऊ, असेही सोपल यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमातही सोपल यांनी आपल्या खास शैलीत विनोदी फटकेबाजी केली.
तर माझाही जय महाराष्ट्र
- पिंपरी-चिंचवडला आ़ सोपल हे मेळावा घेत असताना त्यांच्या निवासस्थानी आ़सोपल यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीत विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये शिवसेना प्रवेशासंदर्भात विचारविनिमय झाला. यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असा विचार मांडला़ शेवटी आ़ सोपल यांना फोन लावला हा विचार सांगितला तेव्हा तिकडून सोपल यांनी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत असाल तर मीही जय महाराष्ट्र म्हणतो़, असे शिवसेना प्रवेशाला अधिकृत दुजोराच दिला.