आपण संवेदनशील असतो तर मोदी पंतप्रधान झाले नसते - राणा अय्युब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:33 PM2018-07-17T12:33:55+5:302018-07-17T12:36:57+5:30

If you are sensitive then Modi would not have become a Prime Minister - Rana Ayyub | आपण संवेदनशील असतो तर मोदी पंतप्रधान झाले नसते - राणा अय्युब

आपण संवेदनशील असतो तर मोदी पंतप्रधान झाले नसते - राणा अय्युब

Next
ठळक मुद्दे२०१० साली मी केलेल्या रिपोर्टिंगमुळे अमित शहा यांना अटक - राणा अय्यूब पुस्तकातून मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुजरातेत केलेल्या कृत्यांचा पर्दाफाश - राणा अय्यूब

सोलापूर : ‘गुजरात फाईल्स’सारखे पुस्तक इतर देशात प्रकाशित झाले असते तर तेथील सरकार कोसळले असते. या पुस्तकातून मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुजरातेत केलेल्या कृत्यांचा पर्दाफाश केला. आता जबाबदारी तुमची आहे. आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा, असे आवाहन पत्रकार आणि लेखिका राणा अय्यूब यांनी केले. आपण संवेदनशील असतो तर मोदी पंतप्रधान झाले नसते, अशी टीकाही त्यांनी केली. 

येथील अ‍ॅड़ गाजीउद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने राणा अय्यूब लिखित ‘गुजरात फाईल्स-अ‍ॅनाटॉमी आॅफ ए कव्हरअप’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन शिवछत्रपती रंगभवन येथे करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, पुस्तकाचे अनुवादक दीपक बोरगावे, सनय प्रकाशनचे शिवाजी शिंदे, डॉ. मिलिंद कसबे, सय्यद इफ्तेखार, अली इनामदार, शब्बीर अत्तार, एम. आय. शेख, महिबूब काझी आदी मंचावर उपस्थित होते.

राणा अय्यूब म्हणाल्या, २०१० साली मी केलेल्या रिपोर्टिंगमुळे अमित शहा यांना अटक झाली. ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. माझे मित्र अ‍ॅड़ शाहीद आझमी खोट्या आरोपाखाली पकडलेल्या माणसांसाठी लढत होते. एकेदिवशी दिल्ली येथे गुजरातमध्ये पकडलेल्या निर्दोष तरुणाच्या खटल्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याचा खून झाला. तो दिवस मला हादरवून टाकणारा होता.

 मी गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. संघाच्या विचारांशी बांधिल असलेली एक अमेरिकन फिल्ममेकर मैथिली त्यागी बनून स्टिंग आॅपरेशन सुरु केले. अंगावर विविध ठिकाणी आठ कॅमेरे लावून अधिकारी, राजकीय नेते यांच्यासोबत संवाद साधला. 
दिवसभर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ रात्री डाऊनलोड करून ठेवायचे. दोन महिने मला सहा वाजेपर्यंत झोप लागत नव्हती. रात्री अचानक कुणी दरवाजावर खटखट होईल का, याची भीती असायची. हे काम सुरु असताना एकेदिवशी मोदींकडून निरोप आला.

एक परदेशी फिल्ममेकर गुजरातमध्ये आली पण मला भेटली नाही, असे त्यांना वाटले. कारण परदेशी लोकांनी केलेले कौतुक मोदींना फार आवडते. मी त्यांना भेटले तेव्हा त्यांच्या टेबलवर बराक ओबामा यांचे पुस्तक होते. ते मला दाखवत मोदी म्हणाले, मला एक दिवस यांच्यासारखे बनायचे आहे. मला मोदींचे कौतुक वाटते. पण त्याचवेळी आपल्या असण्याची लाजही वाटते. आपण संवेदनशील असतो तर हा माणूस देशाचा पंतप्रधान झाला नसता, अशी टीकाही त्यांनी केली. 
कार्यक्रमासाठी गाजोउद्दीन सेंटरचे अध्यक्ष समीउल्लाह शेख, अ‍ॅड. मेहबूब कोथिंबिरे, सर्फराज शेखराम गायकवाड, फारुख तांबोळी, समीर इनामदार, हमीद शेख, दानिश कुरेशी, बशीर शेख आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन साहिल शेख यांनी केले. 

१६ भाषेत भाषांतर, ४ लाख प्रतींची विक्री
- स्टिंग आॅपरेशन पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल तयार केला, पण तो प्रकाशित करण्यास माझ्या संस्थेने आणि इतर प्रकाशकांनीही नकार दिला. अखेर मी माझे दागिने गहाण ठेवून या पुस्तकाच्या ५०० प्रती प्रकाशित केल्या. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दखल घेतल्यानंतर आपल्याकडे त्याची चर्चा सुरू झाली आणि आज परिस्थिती वेगळी आहे. आज या पुस्तकाचे १६ भाषेत भाषांतर झाले आहे. ४ लाख प्रतींची विक्री झाली आहे. आता मला अनेक लोक विचारतात की, आम्ही काय करावे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लढू नका. देशात घडत असलेल्या घटनांबद्दल तुम्ही किती वेळा व्यक्त झाला आहात, याचा विचार करा. तुम्ही असेच राहिला तर २०१९ मध्ये तेच निवडून येतील, असेही राणा अय्यूब म्हणाल्या. 

Web Title: If you are sensitive then Modi would not have become a Prime Minister - Rana Ayyub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.