तुम्हाला ‘चाळिशी’ लागली की गाडीसाठी हवे एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 06:12 PM2021-08-18T18:12:58+5:302021-08-18T18:13:42+5:30
नियम जुनाच : बोगस प्रमाणपत्राला लावला ऑनलाइनचा चाप
राजकुमार सारोळे
सोलापूर : वयाची चाळिशी ओलांडली की ‘चाळिशी लागली,’ असे म्हणतात. सध्याच्या जमान्यात ते काही खोटं नाही. स्मार्ट फोन, संगणकावर वारंवार काम करणाऱ्यांची नजर चाळिशीच्या आतच कमजाेर होते. त्यामुळे या वयानंतर वाहन परवाना नूतनीकरण करताना तुमची नजर कशी आहे हे तपासावे लागतेच. त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक असून, यातील बोगसगिरी रोखण्यासाठी आता हे प्रमाणपत्र ऑनलाइन द्यावे लागणार आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत. पण, याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नव्हती. तक्रारी वाढल्याने नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वयाच्या चाळिशीनंतर नजर कमजोर होते. अशात महामार्गावर मोटारीच्या दिव्याच्या उजेडात चालवित असलेल्या गाडीचा मार्ग काढणे कठीण असते. त्यामुळे गाडी चालविणाऱ्याला दूरचा चष्मा असणे धोक्याचे असते. त्यामुळे चाळिशीनंतर संबंधित व्यक्तीची नजर व शारीरिकदृष्ट्या लायसन्सधारक वाहन चालवू शकतो का, यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे या वयानंतर वाहन परवाना नूतनीकरण करताना डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
लर्निंग लायसन्स ऑनलाइन
- - सध्या आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स दिले जाते. यासाठी ऑनलाइन अर्ज करून फी भरावी लागते. त्यानंतर लायसन्स टेस्टसाठी अपॉइंटमेंट मिळते.
- - अपॉइंटमेंटच्या वेळी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह आरटीओ अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे लागते. तेथे अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून ऑनलाइन चाचणी घेतात.
- - आता घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळविण्याची सोय करण्यात येत आहे. यात घरी केव्हाही अर्ज करून ऑनलाइन चाचणी देण्याची सोय करण्यात आली आहे.
फिट असेपर्यंत मिळेल लायसन्स
- - १८ वर्षांनंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळतो. १८ वर्षांखालील मुलांना फक्त ५० सीसी क्षमतेचे वाहन किंवा विनागिअरचा परवाना मिळतो. पहिल्यांदा २० वर्षे मुदत असते. त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी लायसन्स नूतनीकरण करता येते.
- - कोणत्या प्रकाराचे वाहन चालविण्याचा परवाना घेणार यावर नियम वेगवेगळे आहेत. प्रवासी, मालवाहतूक, जड वाहतूक व मल्टीॲक्सल वाहने, क्रेन, पोकलेन मशीन चालविण्याचे परवाने वेगवेगळे आहेत.
- - वाहन परवाना मिळविण्यासाठी १८ वर्षांनंतर वयाची अट नाही. तुम्ही वाहन चालविण्यासाठी जोपर्यंत फीट आहात तोपर्यंत वाहन परवाना मिळतो. पण, यासाठी चाळिशीनंतर डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्रे देता येणार
१. चाळिशीनंतर डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने आरटीओ कार्यालयाजवळ बीए एमएस डॉक्टर ठाण मांडून बसलेले दिसतात. हे डॉक्टर कमी फीमध्ये दिवसाला कितीही प्रमाणपत्रे देतात.
२. फिटनेस सर्टीफिकेट देताना संबंधितांचे डाेळे व शारीरिक तपासणी करणे आवश्यक असते. पण, बीए एमएस डॉक्टर डोळ्यांची तपासणी न करताच फी दिली की सर्टीफिकेट देताना दिसून येतात.
३. बोगस प्रमाणपत्राला आळा घालण्यासाठी आता एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. अशा डॉक्टरांची आरटीओकडे नोंदणी होईल. त्यांना आरटीओचा नंबर मिळेल. त्यावरून दिवसाला फक्त २० प्रमाणपत्रे त्यांना देता येतील, अशी व्यवस्था ऑनलाइन व्यवस्थेत करण्यात आली आहे.
सर्वसामान्य लोकांना आरटीओ कार्यालयाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व सुविधा ऑनलाइन करण्यात येत आहेत. राज्यात दरवर्षी २० लाख लोक लर्निंग लायसन्ससाठी आरटीओकडे येतात. अशा लोकांना एजंटफ्री सेवा मिळण्यासाठी व डॉक्टरांचे बोगस प्रमाणपत्र रोखण्यासाठी डॉक्टरांनाही ऑनलाइन कोड देण्यात येत आहे.
- अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त