...तर ससा कासवाला हरवू शकतो ! खासदार शरद बनसोडे यांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टिका, सोलापूर जिल्ह्यात भाजपांतर्गत वादाचा नवा अध्याय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:10 PM2018-02-05T15:10:29+5:302018-02-05T15:14:08+5:30
सध्या कासव माझ्या वाटचालीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मी पुरता सावध आहे. तो ससा झोपला होता. म्हणून कासवाने शर्यत जिंकली. आता मी वेळीच जागा झालो आहे. कासवाचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मीच जिंकणार, असा दावा भाजपाचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : सध्या कासव माझ्या वाटचालीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मी पुरता सावध आहे. तो ससा झोपला होता. म्हणून कासवाने शर्यत जिंकली. आता मी वेळीच जागा झालो आहे. कासवाचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मीच जिंकणार, असा दावा भाजपाचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केला.
अचानकपणे खा. बनसोडे यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती. यावेळी सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या संघर्षाला त्यांनी तोंड फोडले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा नामोल्लेख टाळत ‘कासवाच्या लीला’ हा भाजपांतर्गत राजकीय कुरघोडीचा नवा अध्याय माध्यमांसमोर मांडला. सहकार मंत्री राज्यसभा सदस्य अमर साबळे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची चर्चा रंगत असतानाच खा. बनसोडे यांनी भाजपांतर्गत सुरू असलेल्या गटबाजीलाही तोंड फोडले.
ते म्हणाले, कासवाच्या सरंजामशाहीला मी दाद देत नाही. मी त्यांच्या दारात जाऊन उभे रहावे, त्यांचा अंकीत रहावे असे त्यांना वाटते.शिवाय मी दलित आहे त्यामुळे मला सतत अडचणीत आणले जात आहे. माझी उमेदवारी कापण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप करीत खुद्द मोदीजींनी मला जवळ घेऊन मतदारसंघाची चौकशी केली. सुशीलकुमार शिंदे यांचे काय चालले आहे? याची विचारणा केली. तुमची निवडणूक तयारी कुठंपर्यंत आली? अशी चर्चा झाली, ती काही उगीच नाही. १२० खासदारांना मोदीजींनी वेगळे बोलावून तयारी करायला सांगितली आहे. त्यात मी आहे. त्यामुळे माझी उमेदवारी नक्की आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सन २००९ साली सुभाष देशमुख माढा लोकसभा लढवत होते. २०१४ साली उस्मानाबाद मतदारसंघातून त्यांच्या मुलाने बंडखोरी केली होती. दोन्ही वेळेस त्यांचा मला कसलाच उपयोग झाला नाही. मी मोदी लाटेवर आणि जनतेच्या उदंड प्रेमामुळे खासदार झालो. दीड लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. यंदा त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, असा ठाम विश्वास खा. बनसोडे यांनी व्यक्त केला. अमर साबळे यांचा मोदी लाट असताना पिंपरी-चिंचवडमधून ७० हजाराने पराभव झाला. ते शिंदे यांच्यासमोर टिकूच शकणार नाहीत. मीच सक्षम उमेदवार आहे. साबळे आणि शिंदे यांची लढाईच होऊ शकत नाही, असा दावा करीत खा. बनसोडे यांनी यापूर्वी गणेचारी, मधुसूदन व्हटकर यांची उमेदवारी लादण्याचा प्रयत्न केल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. या पत्रकार परिषदेला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे, बाबुराव घुगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------
मोदीजींना चुकीचे फिडींग
सोलापूरच्या प्रचारसभेत कापड उद्योगाबाबत तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य करताना नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलाला सोलापूरचा कपडा पुरविता आला तरी मोठा उद्योग वाढीस लागला असता, असा टोमणा मारला होता. याकडे लक्ष्य वेधले असता, खा. बनसोडे म्हणाले, त्यांना चुकीचे फिडींग झाले होते. कदाचित कापडाऐवजी त्यांना टेक्स्टाईलबाबत बोलायचे होते. तरीही येत्या काळात भारत सरकार सोलापूरचा ग्राहक होईल, असा एखादा उद्योग आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
----------------
सर्वचजण गॅसवर...
- सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यातील गटबाजी योग्यवेळी थांबली नाही तर गंभीर दखल घेण्याची तंबी मुख्यमंत्र्यांनी आपल्यासमोर दिली होती. खरंतर त्यांनी योग्यवेळी जागे व्हायला हवे. ते दोघे एक झाले नाही तर कोणातरी एकाची विकेट नक्की पडणार? असे राजकीय भाकीतही खा. बनसोडे यांनी मांडले. गटबाजीमुळे सध्या आम्ही सर्वचजण गॅसवर आहोत, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
----------------------
बोरामणी विमानतळ अव्यवहार्य
बोरामणीचे आंतरराष्टÑीय विमानतळ अशक्य असल्याचे सांगताना खा. बनसोडे म्हणाले, कार्गो विमानतळ सोलापुरात चालणार नाही. त्यासाठी प्रवासी मिळणार नाहीत. नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून, कार्गोसाठी त्याचा वापर योग्य असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. उडान योजनेतून सोलापूरसाठी मान्यता मिळविली पण सिद्धेश्वरच्या चिमणीमुळे योजना साकार होऊ शकली नाही. चिमणीचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. लवकरच निकाल लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
--------------------
निवडणूक तयारी
गेल्या चार वर्षांत मतदारसंघातील ५६० गावे, सहा नगर परिषदा आपण पिंजून काढल्या आहेत. मी वाड्या-वस्त्यांवर पोहोचलो. न गेलेले गाव दाखवा, माझी राजीनाम्याची तयारी आहे, अशा शब्दात त्यांनी संपर्कात अग्रेसर असल्याचा दावा केला. पंतप्रधान सहायता निधीतून २३ कोटींचा निधी गरजू रुग्णांना मिळवून दिला. सोलापूरचा स्मार्ट सिटीत समावेश, उडान योजनेत समावेश, २६ हजार कोटींच्या रस्त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा ही विकासकामे केल्याचा दावाही त्यांनी केला. यापुढच्या काळात नव्या ५ लाखांच्या स्वास्थ्य विम्यासाठी गावोगावी कार्यकर्ते नियुक्त करुन योजना लोकाभिमुख करण्याचा मनोदय व्यक्त करीत, लोकसभा निवडणूक तयारीला लागल्याचे स्पष्ट केले.