दिव्यांगाचा निधी खर्ची न घातल्यास आयुक्तांच्या कानपटात लगावू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:01 PM2019-05-14T13:01:00+5:302019-05-14T13:03:42+5:30
प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचा सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना इशारा
सोलापूर : महापालिकेने दिव्यांगांच्या विकास योजनांसाठी नऊ कोटी रुपयांची तरतूद केली. पण एक रुपयाचाही खर्च केला नाही. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. निष्क्रिय अधिकाºयाला पाठीशी घालण्याचे काम महापालिका आयुक्त करीत आहेत. तीन महिन्यात परिस्थिती सुधारली नाही तर पोलीस प्रशासनास न सांगता कानपटात घालायला येऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी सोमवारी दिला.
दिव्यांगांचे प्रश्न, परिवहन उपक्रमातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्यासमवेत सोमवारी सायंकाळी बैठक घेतली. परिवहन समितीचे सभापती गणेश जाधव, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार,नगरअभियंता संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, महापालिकेचे कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे, प्रहार संघटनेचे जमीर शेख, अजित कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेने मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात ९ कोटी रुपयांची तरतूद केली. पण निधीच खर्ची पडलेला नाही. मग आम्ही तुमच्यासोबत सौजन्याने का वागायचे, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला.
तुमचे पगार वेळेवर कसे होतात. मग अपंगांचा निधी वेळेवर खर्च का होत नाही. त्यावर कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बच्चू कडू संतापले. या निष्क्रिय अधिकाºयाला तत्काळ हटवा. अन्यथा काम होणार नाही. आम्ही मिटींगमध्ये टेबल वाजविला तर कायदेशीर कारवाई होते. पण या निष्क्रिय अधिकाºयावर कारवाई होत नाही. याची खंत वाटते. कांबळे यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पण आयुक्तांनी त्यांना बाजूला केले.
... तर यंत्रणा तातडीने हलली असती
- ग्रामीण पेट्रोल पंपासमोरील खड्ड्यामुळे एका नागरिकाचा जीव गेला. यासंदर्भात दोषी अधिकाºयाविरुद्ध का कारवाई केली नाही. खड्ड्यामुळे आमदाराचा जीव गेला असता तर गोंधळ झाला असता. पण गोरगरिबाच्या जीवाला किंमत नाही, बच्चू कडू म्हणाले. शहरात बंदीच्या वेळेत वाहन आले होते. त्यामुळे हा अपघात घडल्याची सारवासारव मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी केली. तुम्ही अधिकारी आहात म्हणून अधिकाºयांची बाजू घेत आहात. तुमच्या घरातील माणूस गेला असता तर तुम्हाला काय वाटले असते. तुमचा पाय त्या खड्ड्यात पडला असता तरी महापालिकेची यंत्रणा हलली असती. पण गोरगरिबांसाठी नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.
मल्लाव यांच्या अनुपस्थितीत परिवहनवर चर्चा
- परिवहन हा महापालिकेचा भाग नाही असे तुम्ही आज जाहीर करा, असे सांगत बच्चू यांनी परिवहन संदर्भातील चर्चेला सुरुवात केली. हा आमचाच भाग आहे, असे मनपा आयुक्त दीपक तावरे म्हणाले. कामगारांच्या पगाराचा प्रश्न प्रलंबित ठेवू नका. तुमचा पगार वेळेवर होतो मग परिवहनच्या कामगारांना वंचित का ठेवता. तुमच्या शहरात दोन मंत्री आहेत. त्यांना घेऊन यावर चर्चा करा. त्यांना जमत नसेल तर आम्हाला सांगा, असे बच्चू कडू म्हणाले. हा उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. आचारसंहिता झाल्यानंतर त्यांच्या पगाराबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सभापती गणेश जाधव यांनी सांगितले. परिवहनचे कामगार देविदास गायकवाड यांना बडतर्फ करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यांना सेवेत घेण्यात घेईल, असे मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी स्पष्ट केले. परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक अशोक मल्लाव या बैठकीला अनुपस्थित होते.