सोलापुरातील दुकान अन् कारखाना उघडायचा आहे तर मग तुमच्याकडे हे प्रमाणपत्र आवश्यकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 12:29 PM2021-06-29T12:29:22+5:302021-06-29T12:30:56+5:30
नवीन आदेश : लसीकरण प्रमाणपत्र ठेवणे बंधनकारक
सोलापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकामी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत रविवारी काढण्यात आलेल्या आदेशात शहरातील दुकानदार, कारखानदार व उद्योजकांना आपले व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कोरोना चाचणी व लसीकरणाचे प्रमाणपत्र दुकानात ठेवणे बंधनकारक राहील अशी दुरुस्ती करण्यात येत असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे
आता नव्या नियमानुसार शहरातील दुकाने, कारखाने सुरू करण्यासाठी दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सर्व संबंधित दुकानदार, व्यावसायिक, उद्योजकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना चाचणी केलेल्या छापील आयसीएमआर क्रमांक असलेला वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा व १५ दिवसातून एकदा केलेला प्रयोगशाळेचा निगेटिव्ह रिपोर्ट व ॲन्टी बॉडी टेस्ट प्रमाणपत्र (२ महिन्याच्या कालावधीतील) तसेच लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.
दुकान व कारखानदार यांनी या तरतुदीचा भंग केल्यास या कार्यालयाकडून यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दंडात्मक कारवाईचे अधिकार महानगरपालिकेच्या वसुली लिपीक, आरोग्य निरीक्षक, विभागीय अधिकारी, सहा आयुक्त तसेच पोलीस नाईक व या दर्जाच्यावरील पोलीस अधिकाऱ्यांना राहतील.
कारवाई होणार
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटनेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंड, कायदेशीर कारवाईस पात्र असेल. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटनाविरुध्द संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारीसुद्धा कारवाई करणार आहेत.