सचिवांवर दबाव टाकून बेकायदेशीर ठराव घेतले जाताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:27 AM2021-08-25T04:27:25+5:302021-08-25T04:27:25+5:30
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सचिवांचा वापर करून विकास सोसायट्यांचे ठराव केले जात असल्याची तक्रार सोलापूर कृषी उत्पन्न ...
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सचिवांचा वापर करून विकास सोसायट्यांचे ठराव केले जात असल्याची तक्रार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील- वडकबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे सोमवारी केली. या तक्रारीत बेकायदेशीर ठराव घेतल्यास कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आप्पासाहेब पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की, कंदलगाव सोसायटीच्या शामराव व्हनमाने आणि प्रकाश कोरे या संचालकांना सचिव खोबणा मरगूर यांनी प्रोसिडिंग बुकावर सही करण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यातून त्यांची सचिवांशी वादावादी झाली. या संचालकांनी सोसायटीची सभा बेकायदेशीर असल्याने पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. सचिव मरगूर यांनी याच पद्धतीने आणखी चार सोसायट्यांचे ठराव घेतल्याचे त्यांनी उपनिबंधकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या तक्रारीचा आधार घेत आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्याकडे पत्र दिले. अशा पद्धतीने अनेक संस्थांचे ठराव घेतले जात आहेत. त्याला पायबंद घालावा अन्यथा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत महादेव पाटील (भंडारकवठे), केदारलिंग विभूते (बरामणी), प्रकाश कोरे (कंदलगाव) होते.
-------
सोसायटीच्या सभेची नोटीस बजावली असता दोन्ही संचालकांनी सही करण्यास नकार दिला. सभा अध्याप झाली नाही. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा.
- खोबणा मरगूर, सचिव, कंदलगांव विकास सोसायटी
---