सोलापुरात घरगुती गॅसची अवैध विक्री; २४ सिलिंडर जप्त, १३ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:01 AM2019-01-30T11:01:21+5:302019-01-30T11:03:04+5:30
सोलापूर : शहरात अवैध गॅस विक्रीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी वक्रदृष्टी केली असून, घरगुती गॅसच्या २४ टाक्या जप्त ...
सोलापूर : शहरात अवैध गॅस विक्रीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी वक्रदृष्टी केली असून, घरगुती गॅसच्या २४ टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. १३ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख २३ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शहरात ठिकठिकाणी घरगुती गॅस बेकायदा विक्री होण्याचे प्रमाण वाढले होते. अवैध व्यवसायाची दखल घेऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी धाड टाकण्यात आली. विविध ठिकाणावरून २0 गॅस टाक्या, १ इलेक्ट्रिक वजन काटा, १ इलेक्ट्रिक मोटार व रिक्षा असा एकूण १ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तीन आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली.
जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ गॅस टाकी, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ गॅस टाकी व ९६ हजार ५00 रूपयांचा मुद्देमाल, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ गॅस टाकी व ६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये ६ इलेक्ट्रिक वजन काटे, ६ इलेक्ट्रिक मोटार, ५ अॅटोरिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, कुंभार, माळी, खेडकर, फौजदार भीमसेन जाधव, फौजदार नागेश होटकर यांनी पार पाडली. या प्रकरणी १३ आरोपींविरूद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३, ७ भांदवि २८५, २८६, ३४ अन्वये करण्यात आली आहे.
शहरात बेकायदा घरगुती गॅसची विक्री झाल्याच्या माहितीवरून पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार धोकादायक असून, याची माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
- सूर्यकांत पाटील,
पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा)