आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगीच्या विरोधात ‘आयएमए’ ची सोलापुरात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 12:44 PM2021-02-05T12:44:50+5:302021-02-05T12:44:55+5:30
सोलापूर : केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची (मिश्र चिकित्सापद्धती) परवानगी दिली आहे. याविरोधात ‘आयएमए’च्या (इंडियन मेडिकल असोसिएशन) सोलापूर शाखेतर्फे ...
सोलापूर : केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची (मिश्र चिकित्सापद्धती) परवानगी दिली आहे. याविरोधात ‘आयएमए’च्या (इंडियन मेडिकल असोसिएशन) सोलापूर शाखेतर्फे आयएमए हॉलसमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून दिल्ली येथे होत असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.
नोव्हेंबर २०२०च्या राजपत्रकात सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसीन या आयुर्वेदिक शिक्षण आणि व्यवसाय यांचे नियमन करणाऱ्या संस्थेने आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. आयुर्वेद हे एक प्राचीन शास्त्र असून, त्या शास्त्राचा आम्हाला अभिमान आहे. परंतु, आपल्या शास्त्राची साधना सोडून आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करणे हे समर्थनीय नाही. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यामध्ये बराच फरक असून, अशाप्रकारची परवानगी देऊन एकप्रकारे वैद्यकीय क्षेत्राचे मोठे नुकसान होत असल्याचे ‘आयएमए’चे मत आहे.
सरकारने हा निर्णय रद्द करावा, यासाठी दिल्लीमध्ये १ फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून सोलापुरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये डॉ. हरिश रायचूर, आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. सचिन मुळे, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. मिलिंद चिडगुपकर, डॉ. सुदीप सारडा, डॉ. व्यंकटेश मेतन, डॉ. निहार बुरटे, डॉ. संजय मंठाळे सहभागी झाले होते.