शिवप्रेमींचा आविष्कार; पंढरपुरात छत्रपतींची प्रतिमा कोरली केसांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:34 PM2020-02-19T12:34:41+5:302020-02-19T12:36:23+5:30
पंढरपुरात शिवजयंतीनिमित्त शिवजागर अन् एकच जल्लोष
पंढरपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या (बुधवारी) १९ फेब्रुवारी रोजी जयंती... जयंतीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील ओके हेअर ड्रेसेसचे मालक तुकाराम चव्हाण यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा केसांमध्ये कोरून आगळ्यावेगळ्या पध्दतीने महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. त्यांच्या या कलेचे पंढरपुरातील अनेक शिवभक्तांकडून कौतुक केले जात आहे.
२००७-८ पासून अशा प्रकारची कला त्यांनी जोपासली आहे. रमेश माने आणि सुरज शेटे यांच्याकडून ही कला त्यांनी ही कला शिकून घेतली. यापूर्वी ते जनावरांवर वेगवेगळी डिझाईल काढत असत. नंतर त्यांनी माणसाच्या मस्तकावरील केसांमध्ये वेगवेगळी हेअर स्टाईल काढणे सुरू केले. यापूर्वी त्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वर्ल्ड कप, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारत देशाचा नकाशा यांसह अनेक प्रतिकृती केसांमध्ये आगळ्यावेगळ्या पध्दतीने साकारल्या आहेत.
महापुरूषांनी केलेल्या कार्यांचे स्मरण लोकांनी ठेवावे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचावे यासाठी मी महापुरूषांच्या जयंती अथवा पुण्यतिथीअगोदर त्यांना वेगळ्याप्रकारे अभिवादन करीत असल्याचे तुकाराम चव्हाण यांनी सांगितले.
प्रतिमा कोरण्यासाठी दोन तास
या कामासाठी दीड ते दोन तास जातात. समोर शिवाजी महाराजांची मुर्ती समोर ठेवून हे काम केले. गतवेळी तिघांच्या मस्तकावर अशा प्रकारे शिवाजी महाराज यांची प्रतिमा कोरलेली होती. यावेळी दोघांच्या डोक्यावर सदरची प्रतिमा तुकाराम चव्हाण यांनी साकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.