माढ्यातील नऊ गावांत तातडीने कोविड केअर सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:38+5:302021-04-27T04:22:38+5:30
माढा तालुक्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्यावतीने ज्या गावची लोकसंख्या ५ हजारांपुढे आहे. अशा गावांत तातडीने कोविड केअर ...
माढा तालुक्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्यावतीने ज्या गावची लोकसंख्या ५ हजारांपुढे आहे. अशा गावांत तातडीने कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत. त्यात अरण, बेंबळे, भोसरे, कुर्डू, लऊळ, मोडनिंब, पिंपळनेर, टेंभुर्णी व उपळाई (बु.) या नऊ गावांचा समावेश आहे. त्याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित गावांच्या सरपंच व ग्रामसेवकांना सोमवारी ऑनलाइन बैठकीत दिल्या आहेत.
माढा तालुक्यात आरोग्य विभागाच्यावतीने कोविड तपासणी मोहीमही वेगाने सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधित रुग्णांना कोणत्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवायचे हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाला होता. कारण तालुक्यातील सर्व कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होणे थांबणार आहे. सीईओच्या आदेशामुळे संबंधित नऊ गावांतील ग्रामपंचायत यंत्रणा ही गावात कोविड केअर सेंटर उभारणीसाठी कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे. आता त्या गावातील कोरोनाबाधित रुग्णांना योग्य ते उपचार मिळणार आहेत.