जीएसटीची सुलभतेने अंमलबजावणी करा, केंद्राचे सहसचिव विश्वास यांचे सोलापूरात वक्तत्व
By admin | Published: July 14, 2017 05:03 PM2017-07-14T17:03:05+5:302017-07-14T17:03:05+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १४ : वस्तू व सेवाकराची अंमलबजावणी करताना ग्राहक, व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजक यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी घ्या. ही नवी करप्रणाली सुरळीतपणे लागू व्हावी यासाठी प्रयत्न करा अशा सूचना भारत सरकारचे सहसचिव समीर विश्वास यांनी आज येथे केल्या.
वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणी सुरळीतपणे व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाचे सहसचिव सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज (गुरुवारी) व्यापारी, विक्रेते प्रतिनिधी, ग्राहक संघटना प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी यांच्या बैठका घेतल्या. अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सहायक आयुक्त राकेश नडवाल, वस्तू सेवाकर विभागाचे सहायक आयुक्त उमाकांत बिराजदार आदी उपस्थित होते.
विश्वास यांनी यावेळी वस्तू आणि सेवाकराच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि यंत्रणा विकसित केल्या आहेत. या सुविधा आणि यंत्रणांचा कार्यक्षमपणे वापर करून वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना वस्तू आणि सेवाकरामुळे कर प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी होणार आहे. ही कर प्रक्रिया ग्राहक, व्यापारी आणि उद्योजक यांना समजावून सांगावी. या करप्रणालीबाबत जागरुकता निर्माण करावी. त्यासाठी असणाऱ्या माहिती केंद्राचा वापर केला जावा, अशाही सूचना केल्या. वस्तू आणि सेवाकर प्रणालीसंबंधी केंद्र सरकारची वेबसाईट, मोबाईल अॅप, माहितीपत्रके, पुस्तिकांचा वापर करावा, असेही विश्वास यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित असणाऱ्या व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली निवेदने विश्वास यांना दिली. ग्राहक आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशीही त्यांनी चर्चा केली.