क्रिमिनल प्रोसिजर विधेयकापेक्षा सोलापूर ग्रामीणचं 'ऑपरेशन परिवर्तन' देशभर राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 05:15 PM2022-04-07T17:15:52+5:302022-04-07T17:15:58+5:30
सुप्रिया सुळेंची मागणी; तेजस्वी सातपुतेंच्या कामाचे लोकसभेत कौतुक
सोलापूर : ‘पोलीस आणि जनतेमधील नाते भीतीचे नाही तर आदर आणि प्रेमाचे आहे. त्यामुळे देशभरात क्रिमिनल प्रोसिजर विधेयकापेक्षा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राबविलेल्या ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम देशभर राबवा,’ अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.
लोकसभेत क्रिमिनल प्रोसिजर विधेयक २०२२ यावरील सहभागी चर्चासत्रात खा. सुळे यांनी ही मागणी केली. लोकसभेत माहिती देताना खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘सोलापूरच्या महिला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टी व्यावसायिकांना अवैध धंदे करण्यापासून परावृत्त करून त्यांना सन्मानपूर्वक व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांचा डेटाबेस तयार करून त्यांना विविध कौशल्यपूर्ण कामांचे प्रशिक्षण दिले, अत्याधुनिक मशिनरीचा पुरवठा करून दिला अन् एक वेगळा व्यवसाय उभारण्यास मदत केली.’
---------
पोलीस स्टेशन सुरक्षित वाटले पाहिजे...
दरम्यान, विधेयके ही लोकांची सेवा करण्यासाठी असायला हवीत, ती त्यांना घाबरविण्यासाठी नाही, असे मत खा. सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले. केंद्र सरकारने नागरिकांच्या हिताचे रक्षण करावे. मुली, महिला, बालके जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातील तेव्हा त्यांना तेथे सुरक्षित वाटले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
----------