कुकडीचे पाणी उजनीत सोडून रिटेवाडी उपसा सिंचन योजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:22 AM2021-05-07T04:22:56+5:302021-05-07T04:22:56+5:30
करमाळा : कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्याचे हक्काचे साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणात सोडून हे पाणी रिटेवाडी येथून उचलून विहाळ ...
करमाळा : कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्याचे हक्काचे साडेपाच टीएमसी पाणी उजनी धरणात सोडून हे पाणी रिटेवाडी येथून उचलून विहाळ चढावरील कुकडीच्या कॅनॉलमध्ये सोडून करमाळा तालुक्यातील ३० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आणावे, हा प्रस्ताव गेल्या पाच वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडून आहे. या प्रस्तावाला शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यासाठी कुकडी प्रकल्पातून साडेपाच टीएमसी पाणी सिंचनासाठी राखीव आहे. कुकडी प्रकल्पापासून करमाळा तालुक्यातील शेवटच्या कॅनॉलचे अंतर २४९ किलोमीटर आहे. एवढ्या दूर अंतरावरून करमाळ्याला कधीही गेल्या तीस वर्षांत पाणी मिळाले नाही. या प्रकल्पातील जवळपास पाचशे कोटी रुपयांचे कॅनॉल करमाळा तालुक्यात खोदली आहेत; पण कुकडीतून पाणी सुटले तर ते अहमदनगर जिल्ह्यातच पळवले जाते. करमाळ्याला फक्त अर्धा टीएमसी पाणी कसेतरी मिळते. निकृष्ट दर्जाची झालेली कॅनॉलची कामे व यामध्ये झालेला भ्रष्टाचार, पाणी येताना होणारी फोडाफोडी यामुळे करमाळा तालुका गेल्या तीस वर्षांपासून कुकडीच्या पाण्यापासून वंचित आहे. गेल्या तीस वर्षांत करमाळा तालुक्याचे जवळपास १५० टीएमसी पाणी पुणे, नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी हडप केले आहे.
करमाळा तालुक्यातील ३० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन वर्षानुवर्षे पाण्याच्या थेंबाथेंबासाठी आसुसलेला दुष्काळी भागातील करमाळ्यातील शेतकरी सुखी होईल. या योजनेसाठी केवळ दहा ते अकरा किलोमीटर पाईपलाईन व पंप हाऊसची गरज आहे. या मागणीसाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली. मात्र, शासनाने याची दखल घेतली नाही.
----
सोलापूर जिल्ह्याला तोंड दाबून बुक्क्याचा मार
तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी याबाबत विधानसभेत आवाज उठवला होता. एवढी व्यवहार्य रिटेवाडी उपसा सिंचन योजना वर्षानुवर्षे प्रलंबित आहे, ती बाजूला ठेवून सांडपाण्याच्या नावाखाली उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलणे म्हणजे सोलापूर जिल्ह्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
---------