सोलापुरात दिवसेंदिवस वाढतेय ‘योगा’चे महत्त्व भल्या सकाळी बागा, तलाव परिसर हाऊसफुल्ल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:17 PM2019-06-21T14:17:21+5:302019-06-21T14:22:44+5:30
International Yoga Day 2019 : धावपळीच्या जीवनामुळे वाढतेय महत्त्व ; निरोगी जीवनशैली आत्मसात करण्याकडे कल
सोलापूर : धावपळीचे जीवन, वाढते ताणतणाव यावर मात करून निरोगी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी आज योगाचे महत्त्व वाढत असून, सोलापुरातही दिवसेंदिवस योगाकडे लोकांचा कल वाढत आहे. पहाटेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत बागा, तलाव परिसर हाऊसफुल्ल होत आहेत.
गेल्या काही वर्षांत योगाचे महत्त्व सांगणाºया अनेक संस्था सोलापुरात अस्तित्वात आल्या आहेत. एकट्या एकट्याने साधना व ध्यानधारणा करणाºयांची संख्याही वाढत आहे.
सोलापुरातील खंदक बगीचा, हुतात्मा बाग, धर्मवीर संभाजी तलाव परिसरातील बाग, मार्कंडेय उद्यान, विणकर बाग, जुळे सोलापूर या प्रमुख ठिकाणी योग करणाºयांची वाढती गर्दी लक्षात घेतली तर आज प्रत्येकाच्या जीवनात किती ताणतणाव आहे, हे तर दिसतेच. त्याबरोबरच आरोग्याबद्दलची जागरुकताही वाढलेली दिसून येते. शहरातील सर्व भागात स्वयंस्फूर्तीने योगा करणाºयांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे.
हरळी प्लॉट योगासन मंडळ
खंदक बगीचा येथील हरळी प्लॉट योगासन मंडळ गेल्या ४० वर्षांपासून योग जनजागृतीचे कार्य करीत असून या मंडळाचे १४० सभासद आहेत. पहाटे साडेपाच ते सात अशी यांची योगसाधनेची वेळ आहे. योगाबरोबरच ओंकार आणि सत्संग, भावगीते, भक्तीगीते, प्रबोधन, हास्यविनोद यावरही हे मंडळ भर देते. या सर्व गोष्टी जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे या साधकांचे मत आहे.
सिद्धिविनायक योग व प्राणायाम वर्ग
हुतात्मा बागेतील पतंजली योग समिती संचलित श्री सिद्धिविनायक योग व प्राणायाम वर्ग गेल्या १० वर्षांपासून योगाचे धडे देतेय. या वर्गात ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आजपर्यंत एक हजारांहून अधिक साधकांनी या वर्गाचा लाभ घेतला आहे.
सकाळी सहा ते साडेसात अशी या वर्गाची वेळ असून यात प्रार्थना, व्यायाम, आसने, सूर्यनमस्कार, प्राणायाम, शांतीपाठ टाळ्या आणि हास्य आदी उपक्रमांचा समावेश आहे. येथे रोज एक विनोद सांगितला जातो व त्यावर हसण्याचा हा व्यायाम पार पडतो.
सिद्धेश्वर प्रभात शाखा
हुतात्मा बागेतील सिद्धेश्वर प्रभात शाखा तीन वर्षांपूर्वी स्थापन झाली असून योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार येथे नियमित घेतले जातात. सुरेश इराबत्ती, बाबुलाल वर्मा हे प्रशिक्षक सर्वांना योगसाधनेचे धडे देतात.
हरिओम विणकर बाग संस्था
पूर्व भागातील हरिओम विणकर बाग बहुउद्देशीय संस्था १० वर्षांपूर्वी सुरु झाली असून सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत येथे योगसाधना केली जाते. विनायक सिद्धम हे संस्थेचे अध्यक्ष तर लक्ष्मीकांत दंडी हे उपाध्यक्ष आहेत.
मार्कंडेय उद्यान योगा ग्रुप
पूर्व भागातील मार्कंडेय योगा ग्रुप ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असून संस्थेचे ३५ सभासद आहेत. पहाटे साडेपाच ते साडेसहा ही यांची योगसाधनेची वेळ आहे.
पृथ्वी प्राणायाम वर्ग
जुळे सोलापुरातील पतंजली योग समिती संचलित पृथ्वी प्राणायाम वर्ग ही संस्था २००८ पासून योगाचे धडे देत आहे. नगरसेविका संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सहा ते सात या वेळेत मोफत व कायमस्वरुपी योगसाधना व प्राणायामचे आयोजन करण्यात येते.
संभाजी तलाव प्राणायाम संघ
धर्मवीर संभाजी तलाव अर्थात कंबर तलाव परिसरात असलेल्या संभाजी तलाव प्राणायाम संघाची स्थापना ४ डिसेंबर २००४ रोजी झाली असून संघाचे एकूण २५ सभासद आहेत. प्राणायाम, आसने यावर या संघाचा मुख्य भर असून सकाळी सहा ते साडेसात अशी यांची वेळ असते.
संयुक्त राष्ट्र परिषदेच्या महासभेत मान्यता
- योग, प्राणायाम केल्याने आयुष्य तर वाढतेच आणि ते सुंदरही बनते. हाच धागा पकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव २७ सप्टेंबर २०१४ च्या महासभेत आला. बाबा रामदेवांनी २००६ पासूनच विविध देशांमध्ये योग शिबिरे घडवून आणल्यामुळे योगाचे महत्त्व ज्या-त्या देशांमधील नागरिकांनी जाणले आहे. त्यामुळेच ११ डिसेंबर २०१४ च्या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या महासभेत दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला १९३ देशांपैकी १७७ देशांनी एकमताने मान्यता दिली.
योग म्हणजे काय ?
- - जीव आणि विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती म्हणजे शिव आणि त्यांचे एकत्रीकरण म्हणजे योग. आधुनिक शास्त्राप्रमाणे हे विश्व म्हणजे एकाच तरंगलहरीच्या विविध रुपांचे दर्शन होय. ज्या कुणाला विविधतेमधील या एकत्वाची जाणीव झाली तो योगी. त्याने प्राप्त केलेली जीवनाची अवस्था म्हणजे मुक्ती किंवा निर्वाण किंवा कैवल्य, मोक्ष होय.
- - आत्मसाक्षात्कार घडविण्यासाठी शरीर व मन यांचे एकत्रीकरण साधण्याच्या विविध मार्गांचे अंतरंग शास्त्र योग उलगडून दाखविते. जीवनाचे अंतिम उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून खरा आणि शाश्वत आनंद मिळविण्याचा योग हा एक मार्ग होय.
२१ जूनचे महत्त्व
- - २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस आहे. या दिवसापासून दक्षिणायन सुरू होते. या काळात केलेली योगसाधना ही जास्त प्रभावी असते म्हणून हा दिवस योग दिवस निवडला गेला. योगसाधनेमुळे मानवी जीवनाच्या सर्व अंगांमध्ये एकवाक्यता निर्माण होत असते.