केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेविषयी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर

By Appasaheb.patil | Published: September 23, 2022 05:32 PM2022-09-23T17:32:44+5:302022-09-23T17:33:27+5:30

सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणाले...

Important news about Centre's Ayushman Bharat Yojana; Read in detail | केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेविषयी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर

केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेविषयी महत्वाची बातमी; वाचा सविस्तर

googlenewsNext

सोलापूर : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील गरीब, गरजू नागरिकांवर दर्जेदार व मोफत उपचार करण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून प्रक्रिया गतीमान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यात 23 सप्टेंबर 2018 ला एकत्र करण्यात आली, यानिमित्त आयुष्मान भारत पंधरवडा राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे योजना अंमलबजावणीसाठी उत्कृष्ठ काम केलेल्या आरोग्यमित्रांचा जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रवी भोपळे, डॉ. सुजित हालीघोंगडे, नागराज गुजारे, अकिल मुजावर आदी उपस्थित होते. 

 जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, गरीब, आर्थिक दुर्बल रूग्णांना आरोग्यविषयक सेवा मिळण्यासाठी केंद्र सरकारची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना चार वर्षांपासून एकत्रित राबविण्यात येत आहेत. गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्याच्या सोईसुविधा मिळण्यासाठी या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचवावी. 

जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 'आयुष्मान भारत पंधरवडा' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात दोन्ही योजनेशी संलग्नित 48 शासकीय आणि खासगी दवाखान्यात 30 आरोग्य शिबीरे घेण्यात आली आहेत. योजनेच्या रूग्णालयांनी 12 शाळांमध्ये प्रचार, प्रसार, जनजागृतीबाबत कार्यक्रम घेतले तर 20 आरोग्य शिबीरे 30 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत. आरोग्य शिबीरात आयुष्मान कार्ड, आभा कार्डची नोंदणी करण्यात येणार आहे. आधारकार्ड, रेशनकार्ड सोबत घेऊन शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. भोपळे यांनी केले आहे.

यावेळी दत्तात्रय डेंगळे या लाभार्थ्यांसह अन्य लाभार्थी रूग्णांच्या नातेवाईकांनी राज्य आणि केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले. त्यांनी दोन्ही योजनांचा लाभ घेऊन सहा लाखापर्यंतचे उपचार घेतले आहेत. 

दरम्यान, आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्डाची नोंदणी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सीएससी सेंटर आणि महा-ई सेवा केंद्र चालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये त्यांना कार्डाची नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी योजनेचे समन्वयक डॉ. रवी भोपळे, टीपीए जिल्हा प्रमुख नागराज गुजारे, आयटी सेलचे जिल्हा प्रकल्पप्रमुख रिजवान मुल्ला, सपोर्ट इंजिनीअर आशिष देशमुख, कॉमन सर्विस सेंटरचे जिल्हा प्रमुख धनंजय येवते, सोमेश भोसले आदी उपस्थित होते.

Web Title: Important news about Centre's Ayushman Bharat Yojana; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.