पोलिसाच्या बिलात जास्तीचे १० रुपये लावले, मॉलला ३५ हजाराचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:57 PM2021-12-20T14:57:11+5:302021-12-20T14:58:00+5:30
पोलीस निरीक्षक योगेश वेळापुरे हे सोलापूर येथे शासकीय नोकरीस आहेत. ते सोलापुरात सात रस्ता येथील बिग बाजारमध्ये २० ऑगस्ट २०२० रोजी फेविस्टिकचे दोन नग खरेदीसाठी गेले होते.
सोलापूर/करमाळा - फेविस्टीक खरेदीनंतर ग्राहकांच्या बिलात 10 रुपये जास्त लावल्याने सोलापूरच्या बिग बझार शॉपिंग मॉलला ग्राहक तक्रार निवारण कार्यालयाने मोठा झटका दिला आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीवरुन या मॉलला 35 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबतचा आदेश अ.भि. भैसाने, सदस्या बबिता महंत गाजरे, सदस्य सचिन पाठक यांनी 15 डिसेंबर रोजी दिला.
याबाबत माहिती अशी की, पोलीस निरीक्षक योगेश वेळापुरे हे सोलापूर येथे शासकीय नोकरीस आहेत. ते सोलापुरात सात रस्ता येथील बिग बाजारमध्ये २० ऑगस्ट २०२० रोजी फेविस्टिकचे दोन नग खरेदीसाठी गेले होते. एका नगाची छापील किंमत वीस रुपये असताना, २ नगाचे बिग बाजारकडून ५० रुपये आकारण्यात आले. मूळ किमतीपेक्षा दहा रुपये जास्त घेतल्याचे वेळापुरे यांच्या लक्षात आल्याने, ते बिल घेऊन वेळापुरे बिग बाजारमध्ये गेले असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन माघारी पाठविण्यात आले. त्यानंतर वेळापुरे यांनी १९ मार्च २० रोजी आयोगासमोर तक्रार दाखल केली. सर्व कागदपत्रे व युक्तिवाद ऐकून घेऊन अखेर आयोगाच्यावतीने बिग बाजारला दंड सुनावला. तक्रारदारातर्फे ॲड. रूपेश महिंद्रकर यांनी तर विरुद्ध पक्षाकडून ॲड. पी. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
असा आकारला दंड...
तक्रारकर्ते यांना मानसिक त्रासापोटी पाच हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये विरोधी पक्षाने द्यावेत, असा आदेश देण्यात आला, तर पंचवीस हजार रुपये ग्राहक कल्याण निधीमध्ये जमा करण्यास सांगितले. असा एकूण ३५ हजार रुपयांचा दंड बिग बाजारच्या मॅनेजरला ठोठावण्यात आला.