इम्रान खानने सांगितले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत : असदोद्दिन ओवैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:01 AM2019-04-11T11:01:54+5:302019-04-11T11:05:15+5:30
सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवैसी यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर केली जोरदार टीका
सोलापूर : नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान झाले तर काश्मीरची समस्या दूर होईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. आमच्या देशातील निवडणुकीबाबत वक्तव्य करण्याची इम्रान खानची एवढी हिंमत कशी झाली? इम्रान कितीही सांगत असला तरी येथील वंचित समाज मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाही. इम्रानच्या तोंडात मिठाईऐवजी मिठाचा खडा पडेल, अशी टीका एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवैसी यांनी केली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी येथील पार्क स्टेडियमवर जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
ओवैसी म्हणाले, काश्मीर कुणाच्या बापाचे नाही हे मोदी आणि इम्रान खान यांनी लक्षात घ्यावे. तो भारताचा हिस्सा आहे आणि कायम भारताचा हिस्सा राहील. पाकिस्तानात लष्कराच्या मदतीशिवाय निवडणुका होत नाहीत. पण आज त्या देशाचा पंतप्रधान आणि लष्कर आमच्या देशातील निवडणुकीबाबत बोलत आहेत. सोलापुरातही बडे बडे खान आणि ओरिजनल पठाण आहेत. शिवाय या देशातील अनेक वंचित जमाती, दलित मोदींना पुन्हा पंतप्रधान होऊ देणार नाहीत. आम्ही इम्रानच्या तोंडात मिठाचा खडा टाकू, त्याचे तोंड काळे करु, असेही ओवैसी यांनी सांगितले.
या सभेला माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय मोरे, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, आमदार वारीस पठाण, लक्ष्मण माने, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, चरणसिंह टाक, तौफीक शेख, सुजात आंबेडकर, शंकरराव लिंगे, सचिन माळी, श्रीशैल गायकवाड, समीउल्लाह शेख, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अजित गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.