अक्कलकोटमध्ये भक्तांना प्रथम मास्क मगच दर्शन
By दिपक दुपारगुडे | Published: December 23, 2023 07:30 PM2023-12-23T19:30:12+5:302023-12-23T19:30:32+5:30
सतर्कतेच्या दृष्टिकोनातून शासन निर्देशानुसार मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना तत्काळ मास्कचे वाटप केले.
सोलापूर : कोरोनाच्या जे एन-१ या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात गर्दीच्या पहिल्या दिवशी भक्तगण, अधिकारी, कर्मचारी यांना मास्क वाटप करण्यात आले. त्यानंतर दर्शन देण्यात आले. वटवृक्ष स्वामी समर्थांच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व अक्कलकोट नॉर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सतर्कतेच्या दृष्टिकोनातून शासन निर्देशानुसार मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना तत्काळ मास्कचे वाटप केले.
याप्रसंगी बोलताना पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी गतकाळात साधारणपणे गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावाचा संसर्ग आटोक्यात आला. पण त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटना कडून पुढील काही वर्षातही कोरोना पुन्हा डोके वर काढेल असे जाहीर करण्यात आले होते. स्वामी समर्थांच्या मंदिरात देश-विदेशातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. दररोज स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे-मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रथमेश इंगळे हस्ते भाविकांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे यांची प्रमुख उपस्थिती होती.