बार्शी बाजार समितीत बंद आडत दुकानात शॉर्ट सर्किटने धान्यासह बरदाना जळून खाक
By काशिनाथ वाघमारे | Published: June 25, 2023 09:07 PM2023-06-25T21:07:06+5:302023-06-25T21:07:12+5:30
रविवार सुटी असल्याने बाजार समिती बंद असते.
सोलापूर : बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किरण मारुती गायकवाड यांच्या बंद आडत दुकानात वीजेचा शॉर्ट सर्किट होऊन धान्यांनी भरलेली पोतीसह २५८ कट्टे रिकामी बारदाना जळून दहा लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली.
ही घटना यार्डातील किरण मारुती गायकवाड यांच्या गाळ्या (न.३७) त सायंकाळी पाचनंतर घडली. या घटनेत दीड लाखाचे ४० कट्टे सोयाबीन, दीड लाखाचे ६० कट्टे हरभरा, ४० कट्टे १ लाखाचा राजमा, २ लाखाचे ज्वारीचे ८५ कट्टे, १ लाख २५ हजाराचे तुरीचे २० कट्टे, १ लाखाचा ५ हजारांचे रिकामे नवीन बरदाना असा १० लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.
रविवार सुटी असल्याने बाजार समिती बंद असते. मालक गायकवाड यांनी दुकान बंद करून गेल्यानंतर अचानक शॉर्ट सर्किट होऊन धान्यांनी भरलेल्या पोत्यांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळा पत्रा फुटून बाहेर पडल्याने यार्डातील लोकांच्या निदर्शनास आले. त्याची माहिती किरण गायकवाड यांना कळविताच ते व प्रवीण गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना पाहून त्यांनी तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलास बोलवले. जवळ जवळ एक तासभर पाणी मारून आग विझवली गेली. रात्री उशिरापर्यंत पोलीसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते .