आठ दिवसात सोलापुरात कोरोनाचा दुसरा बळी; रूग्णसंख्या पोहोचली ३८ वर
By Appasaheb.patil | Published: March 20, 2023 07:00 PM2023-03-20T19:00:56+5:302023-03-20T19:01:20+5:30
आठ दिवसात सोलापुरात कोरोनाचा दुसरा बळी आढळला आहे.
सोलापूर : शहरात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. शहर व जिल्ह्यातील रूग्णसंख्या ३८ वर पोहोचली आहे. यात शहरातील ३० तर ग्रामीणमधील ८ रूग्णांचा समावेश आहे.
शहरातील मयत महिला ही बंडे नगर (जुळे सोलापूर) परिसरातील ६४ वर्षाची आहे. त्या महिलेस दोन दिवसांपासून उलटी, ताप असल्याने ११ मार्च २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारा दरम्यान १७ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी १८ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, सर्वच सर्व रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत शहरात ३४ हजार ५९३ कोरोनाचे रूग्ण असून आतापर्यंत झालेल्या मृतांचा आकडा १ हजार ५१८ एवढा आहे. ३३ हजार ४५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
माढ्यात आढळला कोरोनाचा रूग्ण
सोमवारी जिल्हा आरोग्य विभागाचा कोरोना रिपोर्ट जाहीर झाला, त्यात माढा तालुक्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. रविवारी २० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यात १९ जणांचा रिपेार्ट निगेटिव्ह आला असून एकाचा रिपेार्ट पॉझिटिव्ह आला आले. ग्रामीणमधील एकूण रूग्णसंख्या १ लाख ८७ हजार ४२१ एवढी झाली असून मृतांची संख्या ३ हजार ७२१ एवढी पोहोचली आहे. सध्या ग्रामीण भागात दक्षिण सोलापूर २, सांगोला १, उत्तर सोलापूर १, माढा १, बार्शी २ असे ८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.