30 दिवसापासून अडचणी येत होत्या; तीस मिनीटात मिळाला उत्पन्नाचा दाखला, प्रशासनाचे महाशिबीर
By संताजी शिंदे | Published: May 18, 2023 05:54 PM2023-05-18T17:54:32+5:302023-05-18T17:54:40+5:30
गेल्या तीस दिवसापासून उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी भटकंती करावी लागत होती.
सोलापूर : गेल्या तीस दिवसापासून उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मात्र गुरूवारी सुरू केलेल्या महाशिबीरात आवघ्या ३० मिनिटात एका तरूणाला दाखला मिळाला. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाशिबीरात निराधार महिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
सेतू कार्यालय बंद झाल्यापासून विविध दाखल्यांसाठी नागरिकांना भटकंती करावी लागत होती. शिवाय महा-ई-सेवा केंद्रावर जादाचे पैसे आकारले जात होते, अशा तक्रारी येत होत्या. १० व १२ वी च्या परिक्षांचा निकाल लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी तक्रारींची दखल घेऊन नॉर्थकोट प्रशालेत १८ ते २५ मे दरम्यान महाशिबीराचे आयोजन केले आहे. एकाच छताखाली सर्वप्रकारचे दाखले देण्याची सोय केली आहे. सकाळी ९ वाजल्यापासूनच लोकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली.
प्रशालेत जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, रहिवास दाखला, मिळकतीचे प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, पत प्रमाणपत्र, सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र, अल्प भूधारक शेतकरी प्रमाणपत्र आदी दाखले घेण्यासाठी लागणारे फॉर्म ठेवण्यात आले होते. फॉर्म स्विकारण्यासाठी ९ खिडक्या केल्या होत्या. फॉर्म घेऊन लोक भरत होते, सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून खिडक्यांमद्ये जमा करत होते. १० वी व १२ वी चे विद्यार्थ्यांसह महिला, पुरूषांनी गर्दी केली होती. निराधार महिला २१ हजार रूपयाच्या दाखल्यासाठी आल्या होत्या.
दिवसभर अधिकारी ठाण मांडून
महाशिबीरादरम्यान महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयाचे तहसिलदार सैपन नदाफ यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी आदी अधिकारी उपस्थित होते. अधिकारी जागेवर असल्याने नागरीकांना तत्काळ दाखले मिळत होते. अडचणी आल्यास त्या जागेवरच सोडवल्या जात होत्या.