कुर्डूवाडीत तरुणाचे मोबाईल टॉवरवर जाऊन चार तासांपासून अनोखे आंदोलन; नेमकं कारण काय?
By Appasaheb.patil | Published: August 15, 2024 07:03 PM2024-08-15T19:03:46+5:302024-08-15T19:03:57+5:30
जिल्ह्यातील ठराविक महा ई सेवा केंद्र चालक स्वत:चा युजर आयडी इतर खाजगी दुकानात चालवण्यासाठी कमिशन बेसिसवर देत आहेत.
लक्ष्मण कांबळे
सोलापूर - जिल्यातील काही महा ई सेवा केंद्र चालक स्वत:चा युजर आयडी इतर खाजगी दुकानात चालवण्यासाठी कमिशन बेसिसवर देत आहेत. काही ठिकाणी महिन्याचे भाडे ठरवून आयडी वापरण्यास दिलेले आहेत.एकच आयडी अनेक ठिकाणी वापरला जात असल्याने महा ई सेवा केंद्रांवर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण राहत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील महा ई सेवा केंद्र बंद पडत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी व्हिएलई वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे यांनी अनोखे आंदोलन केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी कुर्डूवाडी येथील एका मोबाईल टॉवरवर सुमारे दोनशे फूट चढून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून आंदोलन सुरू केले असून तहसीलदार आंदोलन स्थळी पोहोचले असून खाली येण्याची विनवनी करीत आहेत. त्याला सायंकाळी सात वाजेपर्यंत आंदोलनकर्त्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने येथील स्थानिक प्रशासन टेंन्शनमध्ये आल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील ठराविक महा ई सेवा केंद्र चालक स्वत:चा युजर आयडी इतर खाजगी दुकानात चालवण्यासाठी कमिशन बेसिसवर देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) चालकांवर याचा आर्थिक बाबतीत विपरीत परिणाम होऊन अनेक केंद्र बंद करावी लागली आहेत. दिवसेंदिवस ग्रामीण भागातील अधिकृत महा ई सेवा केंद्र बंद होत असल्याने केंद्र चालक बेरोजगार होत आहे. केंद्र बंद झाल्याने दुसऱ्याचा आयडी वापरणारांचे चांगले फावते आहे.पान टपरी, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, मोबाईल दुकान अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून महा ई सेवा केंद्रांचा आयडी वापरात असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होत नाही. आयडीचे भाडे किंवा कमिशन सोबतच स्वत:चा नफा यामुळे सेवेच्या किमती वाढून जनतेची लुटमार होत असल्याचे आंदोलन करते आंदोलनकर्ते संतोष वाघमारे यांचे म्हणणे आहे.
१५ ऑगस्ट गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून येथील मोबाईल टॉवरवर संतोष वाघमारे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. तेव्हापासून तहसीलदार विनोद रणवरे हे आपल्या काही अधिकाऱ्यांसह आंदोलन स्थळावर पोहोचले असून ते हा विषय वरिष्ठ पातळीवरील असून आपण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावू असे आश्वासन देत असताना देखील आंदोलन कर्त्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन,तहसील विभाग तणावग्रस्त बनले आहे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नागरिकांनी हे आंदोलन पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे.