मारकडवाडीत बॅलेटवर चाचणी मतदान घेण्याची प्रक्रिया रद्द;कायदेशीर मार्गाने लढा सुरु ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 09:08 AM2024-12-04T09:08:36+5:302024-12-04T09:09:14+5:30
पोलिस प्रशासनाने एक जरी मतदान झाले तर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर आमदार जानकर यांनी स्थांशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
माळशिरस (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत आ. उत्तम जानकर गटाच्या वतीने मंगळवारी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान प्रक्रिया सुरू करण्याची तयारी झाली होती. मात्र, पोलिस प्रशासनाने एक जरी मतदान झाले तर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर आमदार जानकर यांनी स्थांशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
निवडणुकीत ईव्हीएमवर शंका घेत जानकर गटाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली. प्रशासनाने मागणी फेटाळून लावली. तरीही ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती. मात्र, पोलिस प्रशासनाने प्रक्रिया थांबवा; अन्यथा गुन्हे दाखल करू, अशा नोटीस दिल्या. दरम्यान, आ. जानकर यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन प्रक्रिया मागे घेत कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका घेतली.
मतदानाच्या दिवशी ५० मतांची चाचणी घेतली
मारकडवाडी येथे तीन मतदान केंद्र आहेत. तीनही केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणुकीपूर्वी चाचणी मतदान घेतले होते. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान यंत्रावर ५० मतांची चाचणी घेतली गेली. या कोणत्याही टप्प्यावर संबंधितांकडून आक्षेप नोंदवले गेले नाहीत, असे निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी कळविले.
मतदानाची आकडेवारी
■ २०१४ (विधानसभा) मतदान १,५३८ पैकी जानकर गटाला ६८५ लीड
■ २०१९ (विधानसभा) मतदान १,६७२ पैकी जानकर गटाला १,०४६ लीड
■ २०२४ (लोकसभा) मतदान २,३७२ पैकी जानकर अन् मोहिते पाटील गटाला ५५५ लीड
■ २०२४ (विधानसभा) जानकर आणि मोहिते पाटील गट एकत्र असतानाही भाजपला १६० मतांच लीड मिळाले.
ईव्हीएमवरील शंकेमुळे बॅलेटवर निवडणूक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. पोलिसांनी प्रक्रिया थांबविली. आता आठ दिवसांत तहसीलवर मोर्चा काढू.
- उत्तम जानकर, नूतन आमदार, माळशिरस
मतदान प्रक्रिया राबविण्यात जानकरांसह मोहिते पाटलांचाही हात आहे. चौकशीची मागणी केली आहे. ईव्हीएमला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
- राम सातपुते, माजी आमदार.