पंढरपूर येथे अडीच गुंठाभर जागेत गांजांची शेती, पाचशेहून अधिक झाडे जप्त
By प्रताप राठोड | Published: April 8, 2023 05:56 PM2023-04-08T17:56:25+5:302023-04-08T17:57:55+5:30
शेवते गावाच्या शिवारात संतोष पुरी याने गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती मिळाली होती.
सोलापूर : शेवते (ता. पंढरपूर) येथे शेतकऱ्यानी अडीच ते तीन गुंठे जागेमध्ये निव्वळ गांज्याची शेती केली होती. याची कुणकुण लागताच पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईमध्ये पाचशेहून अधिक गांजाची झाडे तर जवळपास ११७ किलो वजनाची झाडे, असा सव्वा सोळा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी शेतकरी संतोष चंद्रशेखर पुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
शेवते गावाच्या शिवारात संतोष पुरी याने गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. शेतकरी संतोष पुरी यांनी त्याच्या शेतामध्ये अडीच गुंठा जागेत इतर कोणतेही पीक घेतले नाही. त्या जागेवर गांज्याची लागवड केली होती. या झाडांना ठिबकने पाणीपुरवठा केला जात होता. पोलिसांनी शेतातून २१० गांजाची झाडे, नवीन लागवडीकरिता तयार केलेली २६३ रोपे, लागवड केलेली ८० रोपे लावलेल्या स्थितीमध्ये ठिबक पाइपसह १६ लाख २२ हजार रुपये किमतीचा ११७ किलो ५१ ग्रॅम वजनाचे गांजाचे हिरव्या झाडाची पाने, मूळ, फांदी, फुलणारा शेंडा व लहान रोपे असा मुद्देमाल जप्त केला आहे.