पुणे विभागात सोलापूर जिल्हा नवीन वीज जोडणीत आघाडीवर
By काशिनाथ वाघमारे | Published: May 4, 2023 04:12 PM2023-05-04T16:12:22+5:302023-05-04T16:12:37+5:30
मागेल त्याला वीज, वर्षभरात ६१,३७८ कृषी पंपांना जोडणी
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत सोलापूर, कोल्हापूर, सांगली,
सातारा व पुणे या पाच जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ६१, ३७८ शेतक-यांच्या कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून मागील वर्षभरात एकूण १८, ७४० जोडण्या देण्यात आल्या. 'मागेल त्याला वीज' हे उद्दीष्ठ यशस्वी ठरवण्यासाठी विभागात प्रयत्न सुरू आहेत.
महावितरणकडील माहितीनुसार पुणे विभागात महावितरणने मागेल त्या शेतक-याला लवकरच वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. शेतक-यांनी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आकडे टाकून अनधिकृत वीज वापर केल्यास विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
विभागनिहाय वर्षभरातील वीज जोडण्या
- सोलापूर जिल्हा : १८, ७४०
- पुणे जिल्हा : १३, ३५५
- सांगली जिल्हा : ११९४०
- सातारा जिल्हा : १०४०८
- कोल्हापूर जिल्हा : ६९३५
नवीन कृषिपंप वीज धोरण २०२० नुसार शेतक-यांना नवीन वीज जोडण्या देण्यासाठी कृषी आकस्मिक निधीचा वापर करण्यात आला आहे. यातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. शेतक-यांनी भरलेल्या वीज बिलाच्या रकमेचा वापर करून मागेल त्याला लवकरच वीज जोडण्या देण्यात येत आहे. त्यामुळे शेतक-यांनी थकीत व चालू बिलाचा भरणा करावा. -अंकुश नाळे, संचालक, पुणे, प्रादेशिक विभाग