अबब... २३ दिवसांमध्ये सोलापुरात केली तब्बल आठ हजार लिटर दारू जप्त; ५० लाखांच्या मुद्देमालाचाही समावेश
By Appasaheb.patil | Published: January 29, 2023 04:20 PM2023-01-29T16:20:28+5:302023-01-29T16:21:23+5:30
सोलापुरमध्ये 23 दिवसांमध्ये 50 लाखांच्या मुद्देमालासह 8 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
सोलापूर : अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके दिवस- रात्र कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कायदेशीर कारवाया करीत आहेत. रात्री- अपरात्री सातत्याने धाडी पडत असल्याने मोठा धाक उत्पादन शुल्क विभागाचा सध्या जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यात ७३१० लिटर दारू, ७१,६५० लिटर रसायन अन् ७०० लिटर ताडी जप्त करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारूविक्री ठिकाणे, हातभट्ट्या, धाबे, हॉटेल तसेच गाेवा राज्यातून तस्करी होणाऱ्या दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याविरोधात सातत्याने कारवाई करण्यासाठी विविध विशेष पथके नेमण्यात आली आहेत. तसेच रात्रंदिवस पाळत ठेवून पथकाद्वारे अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यात येत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या सततच्या कारवाईमुळे हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तांड्यावर मोठी भीती निर्माण झाली आहे.
२३ दिवसांत ११३ गुन्हे दाखल
सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०२३ या नव्या वर्षातील अवघ्या २३ दिवसांत ११३ गुन्हे दाखल केले आहेत. अवैध दारूची वाहतूक करणारी दहा वाहने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केली. काही कारवाईवेळी धाड पडताच वाहने सोडून चालक पळून गेल्याच्या घटना आहेत.
२३ दिवसांतील कारवाईतील मुद्देमालाचा तपशील
- १५६ लिटर देशी दारू
- ५,४२६ लिटर हातभट्टी दारू
- ७२ लिटर विदेशी दारू
- १,६५६ लिटर गोवानिर्मित दारू
- ७१,६५० लिटर रसायन
- ७०० लिटर ताडी
जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतुकीविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. ज्या ज्या परिसरात अजूनही असे अवैध धंदे सुरू असतील त्या भागातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क करावा, संबंधितांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येत येईल. - नितिन धार्मिक, पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर