सोलापूरमध्ये मागितल्या शंभर, मिळाल्या केवळ दहा; एसटी विभागात नवीन बसेस दाखल
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 26, 2023 05:16 PM2023-02-26T17:16:26+5:302023-02-26T17:17:01+5:30
सोलापूर एसटी विभागात दहा नवीन बस दाखल झाल्या असून, सर्व बस आरामदायी आहेत.
सोलापूर : एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. सोलापूर एसटी विभागात दहा नवीन बस दाखल झाल्या असून, सर्व बस आरामदायी आहेत. एसटीने एकूण शंभर बसची मागणी केली असून, यापैकी केवळ दहाच बस मिळाल्या आहेत. पूर्वीच्या बसमधील आसन क्षमता ४२ खुर्च्यांची होती. नवीन बसमध्ये एकूण ४४ खुर्च्या आहेत. खिडक्यादेखील खुर्चीच्या समान अंतरावर आहेत. त्यामुळे प्रवाशांना बाहेरचे दृश्य पूर्णपणे दिसेल. खुर्च्यांना कुशनदेखील पूर्वीपेक्षा अधिक आहे. जाड कुशनमुळे खुर्चीवर बसल्यानंतर प्रवाशांना आराम वाटते. नवीन बसेसचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.
प्रत्यक्षात तीनशे नवीन गाड्यांची मागणी असून, यापैकी पहिल्या टप्प्यात शंभर गाड्या येण्याची शक्यता होती. तशी मागणी सोलापूर एसटी विभागाकडून करण्यात आली होती. यापैकी केवळ दहाच बस दाखल झाल्या आहेत. आणखी दहा बस दाखल होण्याची शक्यता आहे. या सर्व बस एसटीच्या मालकीच्या राहतील. दोन वर्षांत सोलापूर आगारातील शंभर एसटी गाड्या स्क्रॅप झाल्या असून, या बदल्यात नवीन गाड्या आलेल्या नाहीत. प्रवाशांच्या गरजेनुसार सोलापूर विभागाला तीनशे नवीन एसटी बसेसची आवश्यकता आहे. तशी मागणी एसटी महामंडळाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.