उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसाला कानशिलात लगावली, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 06:10 PM2023-01-06T18:10:19+5:302023-01-06T18:11:53+5:30
उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसाला कानशिलात मारल्याची घटना सोलापूरात घडली आहे.
विठ्ठल खेळगी
सोलापूर: भोसरे (ता.माढा) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या झालेल्या निवडीनंतर जवळच असलेल्या एका पानटपरी समोर किरकोळ वाद सुरु असताना तिथे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाच्याच कानशिलात लगावली. ही घटना गुरूवारी दुपारी २.१५ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडली.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल संतोषकुमार अंगद जाधवर यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात गावातील दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्यात अक्षय बागल व सागर बागल या दोघांचा समावेश आहे. भोसरे (ता.माढा) येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक गुरूवारी दुपारी झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या बाहेर पानटपरीसमोर संदीपान बागल व गणेश बागल यांचा किरकोळ वाद सुरु होता.
यावेळी निवडणूक कामी कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल संतोषकुमार जाधवर यांना अक्षय बागल याने तुम्ही येथे कशाला आलात? तुमचे काय काम आहे. त्यावेळी अक्षय याला समजावून सांगत असताना सागर बागल हा ही तिथे आला. त्याने तुम्ही अक्षयला काही सांगायचे नाही, तुमचा काय संबंध. तुम्ही एकतर्फी काम करता असे म्हणून दमदाटी केली. पो.काॅ.जाधवर हे आम्हाला आमचे काम करु द्या असे म्हणत असताना देखील जवळच उभा असलेल्या अक्षय बागल याने गणवेशाची गच्ची धरुन उजव्या हाताने जाधवर यांच्या कानशिलात लगावली. यावरून कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे करीत आहेत.